![]() |
| रोक सको तो रोक लो... तीन सामन्यांमध्ये दोन शतकं! ............ |
अजून
दोन वर्षांनी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हे दोघे संघात असतील का नाही? चर्चेचा हा मोठा विषय. पण ह्या मालिकेतील तिन्ही सामन्यांतून
त्यांनी आपल्या बॅटने ह्या चर्चेला चोख उत्तर दिले आहे. ह्या मालिकेवर त्यांचीच ठळक छाप उमटली.
मालिकेतील पहिले दोन सामने तुलनेने चुरशीचे झाले. रायपूरच्या लढतीत साडेतीनशेच्या पार जाऊनही भारताला पराभव चाखावा लागला. त्यामुळेच विशाखापट्टणम येथे आज झालेला सामना निर्णायक होता. तो अगदीच एकतर्फी झाला. त्याचे श्रेय आधी कुलदीप यादवला आणि नंतर मैदानात उतरलेल्या तिन्ही फलंदाजांना. त्यातल्या यशस्वीचे शतक, तर रोहित व विराट ह्यांची अर्धशतके. नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला यजमानांनी.
मालिकेचा मानकरी विराट ठरला,
ह्यात नवल नाही. त्यानं दोन शतकांसह ३०२ धावा केल्या. मालिकेत भारताच्या मिळून ९७८ धावा. म्हणजे संघाच्या धावसंख्येपैकी ३०.८७ टक्के धावा एकट्या विराटच्या.
अलीकडच्या काही वर्षांत आणि काही महत्त्वाच्या लढतींमध्ये दिसून आलं की, विराट
फटकेबाजी न करता एकेरी, दुहेरी धावांवर भर देतो. ती शैली ह्या मालिकेत विराटनं
बदलली. तीन डावांमध्ये त्यानं २४ चौकार आणि १५ षट्कार अशी आतषबाजी केली. रोहितचे जेवढे चौकार आहेत,
तेवढे विराटचे षट्कार.
![]() |
| ह्या टायगरनंही डरकाळ्या फोडल्या! ............ |
महत्त्वाचं म्हणजे मालिकेत
पाहुण्यांचा संघ दोनदा पूर्ण बाद झाला. त्याच्या उलट भारताने फक्त १४ गडी गमावले. कुलदीप यादवनं सर्वाधिक नऊ बळी घेतले. प्रसिद्ध
कृष्णानं सात बळी घेतले, पण त्यासाठी बऱ्यापैकी धावा मोजल्या. अर्शदीप सिंग ह्यानं
पाचच बळी घेतले खरे;
तथापि त्यानं षट्कामागे दिलेल्या धावा जेमतेम साडेपाच होत्या.
भारतानं
मालिका जिंकली, हे महत्त्वाचं. पण त्याहून सुखद गोष्ट म्हणजे ‘टायगर अभी ज़िंदा है...’ हे सांगणाऱ्या
विराट व रोहित ह्यांच्या डरकाळ्या!
(छायाचित्र सौजन्य – bcci.tv)
.........
#भारत_दआफ्रिका #विराट_कोहली #रोहित_शर्मा #कुलदीप_यादव #अर्शदीप_सिंग #एकदिवशीय_मालिका

