Monday 8 March 2021

कामावर न जाणाऱ्या बाया

 

(चित्र https://www.istockphoto.com संकेतस्थळाच्या सौजन्यानं)

खूप जुनी गोष्ट आहे. अकरा वर्षांपूर्वीची. गावाहून रात्री उशिरा घरी आलो. 'समकालीन भारतीय साहित्य'चा ताजा अंक आला होता. चाळताना एक कविता दिसली. वाचली. आवडली. कवितेचं नाव होतं 'उम्मीद' आणि कवी सुरेश नारायण कुसूंबीवाल. पत्ता भुसावळचा दिला होता.

कवितेचा नायक आशा करतोय की, यंदा पाऊस चांगला पडेल नि शेती पिकेल, पिकलेल्या मालाला भाव मिळेल आणि त्यातून कर्जाचा हप्ता जाऊनही हाती काही उरेल बुवा. मुलाला यंदा नोकरी लागेल आणि त्याच्या डोळ्यांतली निराशा मावळेल, यंदाच्या वर्षी कुठे दंगली होणार नाहीत, निवडणुकीत कुणाचे मुडदे पडणार नाहीत, अशीही आशा व्यक्त करतो तो. आशावाद व्यक्त करणारी कविता.

तिचा शेवट फारच सुंदर आहे. कवी लिहितो,

'उम्मीद है कि

कुछ भी हो जाए

न छूटे उम्मीद का दामन

हमारे हाथ से क्योंकि

उम्मीद पर ही टिकी है दुनिया'

... ह्या शेवटच्या ओळी इतक्या आवडल्या की, मध्यरात्र उलटून गेलेली असतानाही लगेच श्री. कुसूंबीवाल ह्यांनी 'एस. एम. एस.' पाठवला. दुसऱ्याच दिवशी त्यांचा फोन आला. आम्ही गप्पा मारल्या. ह्याच कवितेच्या रूपात त्या वर्षी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर काही महिन्यांनी श्री. कुसूंबीवाल ह्यांनी फोन करून घरचा पत्ता विचारला. काही दिवसांतच त्यांचा नवाकोरा कवितासंग्रह घरी पोहोचला. दिल्लीच्या 'शिल्पायन'नं प्रकाशित केलेला हा संग्रह म्हणजे 'बीच बाजार सच'. खरं तर हिंदी फारसं कळत नाही. त्यात पुन्हा ह्या कविता. पण कवीनं एवढ्या प्रेमानं पुस्तक पाठवलं आहे म्हटल्यावर वाचू लागलो. सोप्या भाषेतल्या कविता. त्यातल्या बऱ्याचशा बाईवर - काम करणारी, कामावर न जाणारी, संसाराचा गाडा चालवणारी, पोळ्या लाटणारी बाई. आवडलेल्या एका कवितेचा अनुवाद तेव्हा काम करीत असलेल्या दैनिकाच्या महिला दिनाच्या अंकासाठी केला. तोच इथं देतोय...

औरतें जो काम पर नहीं जातीं

औरतें जो काम पर नहीं जातीं

असल मे वही काम करती हैं

पूरे समय

जंगली फूल की तरह

करती हैं सुगंधित पवन

अज्ञात रहकर


औरतें जो काम पर नहीं जातीं

धरे रहती हैं

गृहस्थी-रथ का चक्र

कैकेयी की तरह, और

जीतता है दशरथ


वे खुश होती हैं

पिंजरे की चिड़िया की तरह


उनकी चहक से

चमचमाती है दीवारें, फर्श

नाचते हैं परदे खिड़कियों के, और

मुस्कराता है घर

पूरे दिन और सारी रात


औरतें जो काम पर नहीं जातीं

उन पर कभी हावी नहीं होती थकान

एक के बाद एक खेल को बदल लेती हैं वे

और, आखइर थक जाते हैं काम उनके आगे

---------------------------------------------

कामावर न जाणाऱ्या बाया

कामावर न जाणाऱ्या बाया

खरं तर अगदी अविरत

त्याच काम करत राहतात

एखाद्या रानफुलासारखं

वाऱ्याला परमाळून टाकण्याचं

अनाम राहून


कामावर न जाणाऱ्या बाया

कसून धरून ठेवतात

संसाराच्या गाड्याचं चाक

अगदी कैकेयीसारखं, आणि

जिंकत असतो दशरथ


खुशीत असतात त्या

पिंजऱ्यातल्या मैनेप्रमाणं


त्यांच्याच किलबिलीनं

चकाकतात भिंती, फरशा

पडदे खिडक्यांवरले नाचतात, आणि

हसतं-खेळतं राहतं घर

दिवसभर आणि सारी रात

 

कामावर न जाणाऱ्या बाया

दमत नाहीत, कधी थकत नाहीत

बदलत राहतात त्या एकामागून एक खेळ

आणि, मग कामंच बापुडी थकतात त्यांच्यापुढं

(पूर्वप्रसिद्धी - ८ मार्च २०१२)

...


6 comments:

  1. अप्रतिम...
    कामावर न जाणाऱ्या किंवा फक्त घरकाम करणाऱ्या, यांची उलघाल अभिव्यक्त करणारी अप्रतिम रचना... बराचवेळ शोधाशोध केली तेव्हा पोस्ट गवसली. डोळेही उघडले... धन्यवाद आणि शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. कामावर न जाणारी कामसू बाई...मस्त रचना..स्त्रीला न चुकलेला कर्तव्य...जन्माबरोबर कामाशी आजन्म जोडलं गेलेलं नातं...

    ReplyDelete
  3. खूप छान झालाय अनुवाद! असं काही वाचलं की, काही तरी करण्याची उमेद निर्माण होते.
    - अपर्णा देगावकर, पुणे

    ReplyDelete
  4. खूप म्हणजे खूपच छान. तुमची 'खिडकी' अगदी निवांत वाचण्यासारखी. पण वेळच होत नाही. अर्थातच घरातली कामं...
    - सीमा मालाणी, संगमनेर

    ReplyDelete
  5. आजच्या 'महिला दिन'साठी एकदम योग्य भाव असणारी कविता.

    आणि अनुवादातला 'परमाळून' शब्द मस्तच! सहीsss
    - विवेक विसाळ, पुणे

    ReplyDelete
  6. चांगली आहे कविता. पण दुसरी आणि तिसरी ओळ नाही आवडली अजिबात.

    'खरं तर, त्याच काम करत राहतात अविरत' ह्या त्या ओळी.

    काय करणार? कामावर जाणाऱ्या बाईची कामावर जाणारी मुलगी आहे मी. 'त्याहीकाम करत राहतात' असं म्हटलं असतं तरी चाललं असतं.

    त्यांनी पुरुषांशी तुलना केली आहे, मान्य. पण तरीही...
    - अनामिक, मुंबई

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...