Saturday 30 June 2018

आणीबाणी...नव्याने जुनी कहाणी













अरे! लागली उचकी, आणा पाणी
आणीबाणी की हो, आणीबाणी!!
झाकती कुणी, उकरती कुणी,
जोरात सुरू झाली खणाखणी

जुनाट विरजण, पुन्हा घुसळणी
हाती लागे ओशट, खवट लोणी
आंबटढाण ताक, ओता पाणी
शिळ्या कढीला, ताजी फोडणी

अरुणाची ती वाणी प्रखर
दुर्गामाता जणू हिटलर
सुरजेवाला भडके सत्वर
शहनशहाचा करी जागर

दोन वर्षांपूर्वीची गोष्ट जुनी
भीष्माचार्य लालजी अडवाणी
चाहूल घेत व्यथिलेही होते,
येतेय बरं पुन्हा आणीबाणी!

अंधारपर्वा मिळतो उजाळा
राजकारण थोडे त्यात मिसळा
कुणी पाळती दिवस काळा
मिसाबंदींचा सत्कारसोहळा

जाहीर होता त्यांना पेन्शन
यांना का हो फुकाचे टेन्शन?
देणारे देतील आणि घेणारे घेतील
विनयाने बरेच नाही म्हणतील!

असेच असे एक अशोकपर्व
आठवे तया अनुशासनपर्व
म्हणती आम्हांस आहे गर्व
शिस्तीत होते देशात सर्व

आणखी काही झाले गोळा
अंधारयुगाचा त्यांना कळवळा
आव आणती जणू सांब भोळा
जखमेवरती थोडे मीठ चोळा!

सांगती चार वर्षांपासुनी
भोगतो देशात आणीबाणी
ती भली अन् आजची बुरी
अशी तुलना करील कुणी?

काय बोलावे, कसे सांगावे
माजले आहेत गोबेल्स फार
अरे! लागली उचकी, आणा पाणी
आणीबाणी की हो, आणीबाणी!!
.
.
.
पंचवीस जून-पंचवीस जून
तो 43 वर्षांचा, झाला जून
तुटुनी पडती परस्परांवर
करीत सारे दिन दिन
विचारतोय आम आदमी दीन
कधी, केव्हा होते अच्छे दिन?’

----------------------------------
(व्यंग्यचित्रे - मंजूल (फर्स्ट पोस्ट) यांच्या सौजन्याने)

7 comments:

  1. छान उपहासगर्भ कविता. आवडली. हल्ली वधू वर दोन्ही पक्षांकडून ऊत आणलेली शिळी कढीच दिली जात आहे उपाशी 'आम आदमी' ला. (इथे 'उपासाचा' असलेला उल्लेख आआपाच्या उपासाशी संबंधित नाही हे विदित व्हावे.)

    ReplyDelete
  2. 'लष्कराला चिथावणी देणाऱ्या' जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या साथीदारांना तुरुंगात टाकून आणीबाणीच्या घोषणेस सुरवात झाली व त्यात निरनिराळ्या पक्षांच्या तत्त्वप्रणालींमुळे एकमेकांवर प्रचंड नाराजी होती. त्यांना निरनिराळ्या तुरुंगात ठेवले असते, तर ते सर्व आपापल्या तत्त्वप्रणालीस चिकटून बसले असते. त्यांना एकत्र ठेवल्यामुळे आपल्या कॉमन शत्रूबद्दल त्यांच्या भावंना तीव्र झाल्या.

    सुरवातीस आणीबाणीमुळे बसच्या रांगा व्यवस्थित लागू लागल्या, संध्याकाळी अवेळी बाहेर राहण्यापेक्षा नागरिक घरी आपल्या मुलाबाळांत परतू लागले, आवश्यक वस्तूंच्या किमती खाली आल्या. पण हळुहळू माज चढला काँग्रेसी नेतृत्वास व त्यांना पुढारीपण देण्यासाठी सम्राट होण्याच्या इर्षेने संजय गांधी पुढे सरसावले. त्यातून संततीनियमन ह्या एका उत्कृष्ट निर्णयाचे मातेरे झाले.

    आता माझे लिखाण तुम्ही मान्य केल्याशिवाय प्रसिद्ध होणार नाही, असा निर्बंध आहे; तर त्या काळातील प्रेसवर नियंत्रण आणल्याबद्दल कशाला विरोध!
    - भाल पाटणकर, मुंबई

    ReplyDelete
  3. आजच्या राजकारणावर छान व्यंग्य, व्यंगचित्रांसह पेश केलेत की!
    - प्रियंवदा कोल्हटकर

    ReplyDelete
  4. मस्तच जमलंय की! ठसका लागला वाचताना...
    - डॉ. ऊर्मिला चाकूरकर, पैठण

    ReplyDelete
  5. आणीबाणी वरील परखड भाष्य आवडले. विनोबांनी अनुशासन पर्व म्हणून आणीबाणीचा गौरव केला होता. काही फायदे झाले असतीलही, तरी ती आणीबाणी लादली होती. सध्या आणिबाणीसदृश वातावरण आहे असे म्हटले जाते. माझा अनुभव तसा नाही इतकेच !

    ReplyDelete
  6. उपहासात्मक कविता वाचायला छान वाटते आणि प्रश्न पडतो कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही का आपण फक्त बघत बसावे
    एक ज्वलंत प्रश्न कवितेतून पुढे आणल्याबद्दल ...अभिनंदन

    ReplyDelete
  7. गणपत वाण्याच्या छुप्या आणीबाणीने खिडकी काव्यमय केली. काव्यातून वर्णिलेला लबाड तमासगिरांचा तमाशा याची दाद देतो.

    'ब्रेकनंतर पुन्हा आपले स्वागत' असं म्हणत तमाशा जाऊन पुन्हा कलगी-तुरा येईल. ज्या खिशात हात घालावा, त्या खिशात खोटाच पैसा निघतो! करायचं तरी काय?
    - श्रीराम वांढरे

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...