शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

‘एनडीए’तील बिघाडीची आघाडी!

(शीर्षस्थ टिपा :
१ - अधिक स्पष्टीकरणासाठी कोणत्याही लेख-कथा-कादंबरीच्या तळाला टिपा देण्याची पंरपरा आहे. तथापि सोशल मीडियाचं ब्रीदच जुने जाऊ द्या मरणालागुनि असल्यानं त्याला जागत वरतीच टिपा देत आहोत.
२ - या कथेतील पात्रं, प्रसंग आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन आदी कुठल्याही क्षेत्रातील घडामोडी यांचा वास्तवाशी काडीचा संबंध नाही. तसा तो वाटल्यास योगायोग समजावा. न वाटल्यास कपिलाषष्ठीचा योग समजावा!
३ - कथेतील पात्रांना काही तरी नावं असावीत म्हणून ती दिली आहेत. अर्थातच, नावं ठेवणं या आपल्या परंपरेला जागून ही नावं दिली गेली आहेत.)
--------
थोडीथिडकी नाही, तब्बल चार वर्षं होऊन गेली त्याला आता. आमच्या ग्रूपसाठी अच्छे दिन आले होते. सच्चे दिन, अच्छे दिन!

ग्रूप म्हणजे आमचा गटबिट नाही हो. नो गटबाजी तसली. आम्हाला अच्छे दिन येण्याचं कारण निवडणुका, राजकारण, सातवा वेतन आयोग, सेन्सेक्सची मुसंडी असलं काही भौतिक किंवा ईहवादी नव्हतं. ढेप्यानं आणले होते हे अच्छे दिन आमच्यासाठी. त्याच्या जोडीला होती नमूताई.

ढेप्या आणि नमूताईनं मिळून मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सॲप ग्रूप सुरू केला. तू व्हॉट्सॲपवर आहेस ना?’, या सततच्या प्रश्नाला सातत्यानं नकारार्थी उत्तर देऊन आपण मागास असल्याचं आणि टेक्नोसॅव्ही नसल्याचं जगजाहीर होतं. त्यामुळं हळुहळू सगळ्यांनी अँड्रॉईड वगैरे स्मार्ट फोन घेऊन आपण काळाबरोबर असल्याचं दाखवून दिलं.

तो काळ व्हॉट्सॲप ग्रूपच्या साथीचा होता. साथीत जसे पटापट जातात, त्याप्रमाणं रोज एक से बढकर एक ग्रूप सटासट तयार होत. फोनबुक पाहून लोकांना दणादण ॲड केलं जाई. ढेप्या-नमूताई या साथीला बळी पडले. (अति)उत्साही वातावरणाचा परिणाम झाल्यानंच त्यांनी ग्रूप सुरू केला. ढेप्या त्याचा आद्य ॲडमिन आणि नमूताई को-ॲडमिन. त्यात त्यांनी आमचा अख्खा ग्रूपच घेतला. आमच्यातले काही शाळेपासूनचे मित्र, काही कॉलेजमधले, काही नोकरीतले. काही मित्रांचे मित्र, काही मैत्रिणींच्या मैत्रिणी. काही मित्रांच्या मैत्रिणी आणि काही मैत्रिणींचे मित्र. शेवटच्या दोन प्रकारांतील मंडळींना ॲड करायला अनुक्रमे काही मैत्रिणींचा नि काही मित्रांचा विरोधच होता. पण ॲडमिनद्वयीनं त्याला मुळीच किंमत दिली नाही. अच्छे दिनचा प्रभाव असल्यानं ॲडमिन ढेप्याविरुद्ध कुणाची 'ब्र' काढायची हिंमत नव्हती. त्यामुळं ग्रूप बराच मोठा झाला आणि त्यातली काही समीकरणं बदलली नि जोडीला नवी प्रकरणं निर्माण झाली. पण ते खूप नंतरचं...

ढेप्यानं ‘Friends4Ever’ अशा नावानं ग्रूप सुरू केला आणि पहिलं काम काय केलं, तर नमूताईला ॲड करून घेतलं. मग दोघांची फोनोफोनी झाली. पहिल्या १० मिनिटांतच त्यानं आमच्यापैकी १७ जणांना ग्रूपवर इनव्हाईट केलं. त्यात अस्मादिकांचा समावेश होता. दिवसभर ढेप्या आणि आमची ग्रूपबाबत बऱ्यापैकी चर्चा झाली. ऑफिसमधून घरी आल्यावर ढेप्यानं रात्रीत पुन्हा ६० जणांना फ्रेंड्समध्ये घेतलं. तेव्हा ग्रूपची सदस्यसंख्या १८० वगैरे अशी मर्यादित होती. ढेप्या गंमतीनं म्हणायला लागला,व्हॉट्सॲपच्या इतिहासात आपला ग्रूप सगळ्यांत मोठा. आपले सतराशे साठ मेंबर आहेत!’

आमच्या ॲडमिनद्वयीबद्दल थोडं सांगायलाच हवं. ढेप्या आणि नमूताई अगदी बालवाडीपासूनचे मित्र. त्यांचे हिटलर आणि त्यांची अर्धांगंही परस्परांचे मित्र. फक्त आपापले हिटलर कोण, याबाबत त्यांचे थोडे मतभेद. ढेप्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी तो मान तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या बाबांना. आणि नमूताईसाठी तिची बँकेत व्यवस्थापक असलेली आई! तर ढेप्या आणि नमूताई अजून थोड्याच दिवसांनी, त्यांच्या मते वेल सेट्ल्ड झाल्यावर, तुझ्या गळा-माझ्या गळा करणार, हे नक्की होतं. आम्हा मित्रांना माहिती होतं आणि दोघांच्या घरच्यांनाही. हिटलर आणि त्यांच्या अर्धांगांना हे नातं मान्य असल्यामुळं दोघांची थोडी पंचाईतच झाली. विशेषतः नमूताईची. पळून जाऊन आणि हिटलरच्या नाकावर टिच्चून दोनाचे चार करायचे होते तिला. त्यातलं थ्रिल एंजॉय करायचं होतं. पण या जन्मात तरी ते शक्य नव्हतं. तिच्या आईच्या मते तर ती जेवढ्या लवकर ढेप्याच्या घरी जाईल तेवढं बरंच.

ढेप्या हे काही त्याचं खरं नाव नाहीच मुळी. साहित्याची आवड असलेल्या त्याच्या आईनं बाळाचं नाव मोठ्या कौतुकानं दीपंकर ठेवलं. कॉलेजमध्ये गेल्यावर नमूताई त्याला लाडालाडानं पेढा म्हणायची. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसांत जिमबिम बंद झाल्यान पेढा थोडा सुटला; काहीसा बसका झाला. एकदा तो नसताना नमूताई आमच्या ग्रूपमध्ये चुकून वाटणारं मुद्दामहून बोलून गेली, पेढा आता इतका सुटायला लागलाय की, गुळाच्या ढेपेसारखा दिसतोय.’ झालं! त्या दिवसापासून तो ढेप्या!

नमूताई म्हणजे नम्रता. अधूनमधून, म्हणजे तासातली काही मिनिटं ती उद्धट वागायची. तिच्या मते ते रोखठोक वागणं. तिच्या आईचं म्हणणं होतं की, तिच्या आणि बाबांच्या आयुष्यात दोन महत्त्वाच्या चुका झाल्या होत्या - एक म्हणजे तिनं अशा मुलीची आई बनणं आणि दुसरी सर्वांत महत्त्वाची ती ही की, अशा उद्धट, कुणाचंच न ऐकणाऱ्या पोरीचं नाव बाबांनी नम्रता ठेवणं. रोखठोक असूनही नम्रताला असं वाटे की, कुणाचं काही चुकलं, तर आपण त्याला समजावून सांगावं. त्याच्या चुका मोठ्या मनानं पोटात घेतल्या पाहिजेत. त्यानुसार ती बऱ्याच वेळा ताईच्या भूमिकेत जाऊन ढेप्यालाही चार गोष्टी सांगी. त्याला वैतागून ढेप्यानंच तिला नमूताई म्हणायला सुरुवात केली.
-------xxx------xxx-------
ग्रूपची सुरुवात झाल्यावर पहिले काही दिवस गुड मॉर्निंगच्या पोस्ट नित्यनेमानं पडायला लागल्या. सकाळी १० वाजेपर्यंत १७-६० मेंबरांचं गुड मॉर्निंग फुलांसकट व्हायचं. त्यातले काही अभ्यासू सुविचारही टाकायचे. रात्रीनंतर गुड नाईट-स्वीट ड्रीम्सचा रतीब सुरू व्हायचा. काहींच्या मते प्रत्येक पोस्टला 👍 👍 👍 किंवा 🙏 🙏 🙏 असं करून प्रोत्साहन देणं त्यांचं कर्तव्यच. त्यांच्या अंगठ्यांना आणि नमस्काराला सगळेच वैतागले. पण सांगणार कोण या सखाराम गट्ण्यांना?

शोनूबाळ म्हणजे शौनक आमच्या ग्रूपमधला सगळ्यांत टेक्नोसॅव्ही. अर्थात हे त्याचं मत. असा व्हॉट्सॲप ग्रूप त्यालाच सुरू करायचा होता. ढेप्यानं पहिल्या रात्री (म्हणजे ६०च्या दुसऱ्या गटात) ॲड केल्यावर त्यानं पहिली पोस्ट टाकली ती अशी - खरं म्हणजे असा ग्रूप फॉर्म करायचा म्हणून मीच महिनाभरापासून विचार करत होतो. पण ढेप्या ओके. तू सोपं केलंस माझं काम. 👍

क्रेडिट खायची सवय शोनूबाळाला पहिल्यापास्नं. इथंही तेच केलं त्यानं. वर ढेप्याला ग्रूप कसा चालवावा आणि महत्त्वाचं म्हणजे काय खपवून घ्यायचं नाही, याचं लेक्चरही दिलं फोन करून. ढेप्यानं सांगितलं म्हणून आम्हाला कळलं ते.

ग्रूप सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात शोनूबाळानं ग्रूपचं नाव बदललं. त्यानं नामकरण केलं, ‘NDA’! त्याच्या पुढची इमोजी - 💑

सरळ नाकासमोर चालणाऱ्या ग्रूपमधल्या काहींना हे नामांतर का, ते काही कळलं नाही. त्यांना वाटलं, लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएची सत्ता आल्यामुळं शोनूबाळानं हा बदल केलाय. त्यांना समजून सांगण्यासाठी शोनूबाळानं पोस्ट टाकली खास - ‘NDA’ म्हणजे नमूताई, ढेप्या अँड असोसिएट्स. असोसिएट्स म्हणजे आपण सगळे. नमूताई आणि ढेप्याचं जमल्यात जमा असल्यामुळं सगळ्यांना हे नवं नामकरण आवडलं. ग्रूपवर हे अंगठेच्या अंगठे उमटले. ते कोण्या बाहेरच्यानं पाहिले असते, तर त्याला वाटलं असतं, अशिक्षितांचा ग्रूप आहे हा!

गोड गोड बोलण्याचा, एकमेकांची वाहवा करण्याचा महिनाभरातच सगळ्यांना कंटाळा आला. सज्जनपणाचे मुखवटे काढल्यावर ग्रूपमध्ये खऱ्या अर्थानं मजा यायला सुरुवात झाली. प्रीतीनं व. पुं.चे जीवनविषयक २३ विचार अशी पोस्ट, अर्थातच फॉरवर्डेड टाकली. तेव्हा खेचाखेची सुरू झाली. ढेप्यानं लिहिलं - व. पु. काळे यांना मी लेखक म्हणून ओळखतो. ते तत्त्वज्ञही होते?’ 😕 😕 😕


नमूताईनं लगेच विचारलं - का लेखक तत्त्वज्ञ असू शकत नाही का? वाद नको म्हणून ढेप्यानं नमूताईचा हा प्रश्न वेल लेफ्ट केला.

एका सखाराम गटणेनं युनेस्कोनं भारताच्या राष्ट्रगीताची जगात सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली, अशी पोस्ट टाकली. त्यावर शोनूबाळानं आधी खदाखदा हसून घेतलं. त्यानं लिहिलं, अरे पप्पू! या युनेस्कोला असली काम आहेत का बे? मी इ-मेल वापरतोय तेव्हापासून म्हणजे १० वर्षांपूर्वी या असल्या इ-मेल वाचतोय. तंत्रज्ञान वापरण्यात आपण कसं सगळ्यांच्या पुढं आहोत, हे दाखवण्याची संधी त्यानं इथंही नाहीच सोडली. वरतून देशभक्ती म्हणजे कांजिण्या अशा अर्थाचं आईनस्टाईनचं काही तरी वाक्यही टाकलं. ढेप्यानं शोनूबाळाला 👐 👐 अशी सहमती दाखवत एक सुधारणा सुचवली, बाळा, तो पप्पू नसून फेकू आहे फेकू!’

फेकू वाचल्याबरोबर नमूताई खवळली. प्रधानसेवकांना असं काही म्हटलेलं तिला मुळीच चालायचं नाही. त्यामुळं त्या पदाची आणि देशातील ६०० कोटी जनतेची अप्रतिष्ठा होते, असं तिला वाटायचं. तसं तिनं लगेच पोस्टूनही टाकलं. एरवी गप्प असणाऱ्या चतऱ्यानं (म्हणजे चित्तरंजन!) तिला लगेच सुनावलं, नमूताई, आपली लोकसंख्या सव्वा अब्जांच्या आसपासच आहे गं अजून. तू आणि ढेप्यानं लग्न केल्यावर ती फार तर एका-दोनानं वाढेल.👪  त्या दिवशी सर्वाधिक अंगठे चतऱ्यानं मिळवले. बऱ्याच मेंबरांनी हसून हसून पुरेवाट झाल्याची भावना व्यक्त केली - 😛 😜 😝 😁

ढेप्या आणि नमूताई यांचं ग्रूपवर वाजणं आता काही नवं राहिलं नव्हतं. ढेप्या म्हणजे नमूताईच्या भाषेत फुरोगामी. आणि ढेप्या तिचा उल्लेख भगतबाई असा करू लागला. या दोघांचं पुढं कसं काय व्हायचं, अशी काळजी एव्हाना ग्रूपवरच्या बऱ्याच मेंबरांना वाटू लागली होती. एरवी ते जोडीनं फिरायला जात असले, सिनेमाला जात असले आणि घरी येणं-जाणं असलं, तरी ग्रूपवर मात्र त्यांचं जमताना दिसत नव्हतं. दोन ध्रुवांवर दोघे आपण... असंच तिथलं चित्र. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, आपल्या परंपरा, आयुर्वेद, डॉक्टरी सल्ले... सगळ्याच बाबतीत या ॲडमिनजोडीची टोकाची मतं व्यक्त होत होती. राजकीय पोस्ट वर्ज्य असा नियम असलेल्या या ग्रूपवर फेकू, पप्पू अशा शब्दांची फेकाफेक सुरू झाली.

बनहट्टीनं (जयेश बनकर त्याचं नाव. पण बाबा भयंकर हट्टी. म्हणून शोनूबाळानं त्याला बनहट्टी बनवलेलं सगळ्यांनाच पसंत पडलं.) मध्येच कधी तरी एक सेमी-नॉनव्हेज जोक टाकला. 

तो वाचून ताई संतापली. 😡 😠 😠 😠 असा संताप व्यक्त करत तिनं बन्याला खूप काही सुनावलं. नैतिकता, सभ्यता, महिलांची प्रतिष्ठा इत्यादी इत्यादी.

ढेप्यानं आधी विनोद वाचलाच नव्हता. पण ताई संतापल्याचं पाहून त्यानं तो वाचला आणि त्याच्यावर इमोजीचा पाऊसच पाडला - 😂 😆 😇 😊 😍 नंतर तो ताईकडं वळला - बास झाली गं तुझी ताईबाजी. भैताड लेक्चर देऊन राहिली (ही वाक्यरचना खास तिला राधिका आवडते म्हणून). विनोदाकडं विनोद म्हणून बघ ना कधी तरी. मुलींच्या ग्रूपवर तर ह्याच्याहून भयंकर विनोद असतात. नमूताई अजूनच भडकली. पेट्रोलच्या किमती भडकाव्यात तशी. तू ड्यू-आयडी घेऊन किती मुलींच्या ग्रूपमध्ये आहेस ते सांग ढेप्या!’ ढेप्या-नमूताई ठिणगी पडल्यामुळं त्या दिवशी ग्रूप शांतच राहिला.

मध्येच एकदा धर्मग्रंथीनं, अर्थात गीता पाटीलनं धमाल उडवून दिली. तिनं मेसेज टाकला - प्रो. डॉ. शर्मा अखेर गेले...  डॉ. शर्मा तसे विद्यार्थिअप्रिय शिक्षक. पण गीताचा मेसेज वाचून ‘RIP’, ‘RIP’ सुरू झालं. ही इंग्रजाळलेली रीत मान्य नसल्यानं नमूताईनं ओम शांती... म्हणून श्रद्धांजली वाहिली. मेसेजमध्ये अखेर शब्द वापरल्यानं तिनं धर्मग्रंथीला थोडं झापलंही.

उत्तरादाखल धर्मग्रंथीनं लिहिलं - तुमचा सगळ्यांचाच गैरसमज झालाय. शर्मा दीड वर्षापासून जर्मनीला मुलाकडं जाणार असं सांगत होते. ते गेल्या आठवड्यात तिकडं रवाना झाले म्हणून मी तसं टाकलं. तिनं शेवटी लिहिलं - सगळ्या ‘RIP’वाल्यांसाठी ‘RIP’! Cool down guys!!

ठिणगी पडली होती. वातावरण धुमसतच होतं. नमूताईनं त्या दिवशी एका स्वयंघोषित आयुर्वेदाचार्याची पोस्ट फॉरवर्ड केली - रोज उठल्यावर पिता येईल तेवढं गरम पाणी प्या आणि अंघोळ नेहमी गार पाण्यानं करा. खाली कंसात विशेष सूचना होती - आले तसे वाचून पुढे पाठवले.

ही आणखी एक फेकू पोस्ट अशी सुरुवात करून ढेप्यान जोरदार बॅटिंग केली. अंघोळीला पाणी गरम हवं आणि सोसवेल एवढं गार पाणी प्यावं. सकाळी उठून दोन लिटर पाणी पिऊन किडन्या बुडवून टाकायच्यात काय? 😔 😕 आणि आलं तसंच पुढं ढकलायचं म्हटल्यावर शाळा-कॉलेजात एवढी वर्षं घालवायची तरी कशाला...

मध्येच कधी तरी जीडीपीचा विषय निघाला. नोटाबंदीमुळं ही परिस्थिती आली. गेल्या ७० वर्षांत असं कधी झालं नव्हतं, असं ढेप्यानं लिहिलं. त्याचा अनुल्लेख करीत नमूताईनं पोस्टलं, हो, आलू की फॅक्ट्री उघडली असती, तर असं नक्कीच झालं नसतं हं.’ 😨 😂 😉

पुढचे काही दिवस फेकू आणि पप्पू यांच्या निमित्तानं ढेप्या आणि नमूताई एकमेकांना ट्रोल करीत राहिले. अक्षयकुमारच्या रुस्तमला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळालं आणि भडका उडाला. खरं तर सुवर्णकमळावर दंगलचा अधिकार आहे. पण आमिर कुठंय प्रधानसेवकांचा मित्र!’, असं ढेप्यानं लिहिलं. आक्कीची जबरा फॅन असलेल्या नमूताईला हे सहन झालं नाही. ती ग्रूप इन्फोवर गेली. स्क्रोल करत एक्झिट द ग्रूपपर्यंत पोहोचली आणि खटकन बटन दाबलं!
 -------xxx------xxx-------

ग्रूपवर दोन-चार दिवस शांतताच होती. इतना सन्नाटा क्यूं है भाई... असं शोनूबाळानं विचारलंही. नमूताईनं ग्रूप सोडल्याचं त्याला माहीतच नव्हतं. कळल्यावर त्यानं ढेप्याला बोल लावला. त्यामुळं ढेप्या भयंकर चिडला. ॲमिनची जबाबदारी शोनूबाळाच्या खांद्यावर टाकून त्यानं नमूताईचं अनुकरण केलं.

एनडीएमध्ये फूट पडली! दोन्ही नाराज शिलेदार बाहेर. त्यांनी अजून वेगळा ग्रूप सुरू केला नव्हता, एवढाच काय तो दिलासा. आघाडीची बिघाडी झाल्यामुळं सगळे  ...अँड असोसिएट्स अस्वस्थ.

चतऱ्यानं तेवढ्यात शहाणपणा केला. त्यानं साळसूदपणे विचारलं, ग्रूपच्या नावापुढची इमोजी बदलू का? आता ही टाकू? - 💔 💔  चतऱ्याचा आगावूपणा कुणालाच आवडला नाही. सगळ्यांनी त्याच्यावर पडी केली त्या दिवशी.
  
ढेप्या आणि नमूताई, दोघांचीही समजूत काढून पुन्हा ग्रूपमध्ये आणण्यासाठी मेंबरा लोगचं शोनूबाळवर दडपण सुरू झालं. दोघांशीही फोनवर बोलून शोनूबाळानं त्यांना राजी केलं. ढेप्यानं फार आढेवेढे नाही घेतले. नमूताईनं मात्र ॲमिननं ग्रूपचे नियम बनवले पाहिजेत, या अटीवर पुन्हा प्रवेश केला.

मूळचे ॲमिनद्वय आता साधे मेंबर झाले होते. एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचं दोघंही कटाक्षाने टाळत. कधी विषय निघालाच, तर आपण त्याची पोस्ट वाचतच नाही, असा आविर्भाव असायचा त्यांचा. मला पीएच. डी.चा थिसिस दोन महिन्यांत द्यायचाय. त्यामुळं चिल्लर पोस्ट वाचून त्यावर कमेंटून वाया घालवायला माझ्याकडं वेळच नाही, असं लिहून नमूताईनं खिजवलं. ढेप्याही साहित्य, समाजकारण, तत्त्वज्ञान वगैरे पोस्ट फॉरवर्ड करू लागला. मधूनच तो छान छान गाणीही टाकी. त्याला लाईक करायचा मोह होऊनही नमूताई तो टाळत राहिली.

मिनच्या अधिकारात शोनूबाळानं नवीन काही मेंबर केले. पियू त्यापैकीच एक. एकदम ॲक्टिव्ह मेंबर. रोज वेगवेगळ्या पोस्ट. सहसा कधीच न वाचलेल्या. विनोदही हटके. कुणाच्याही पोस्टवर पियूच्या हजरजबाबी कमेंट हमखास.

ग्रूपवरचा पियूचा वाढता वावर नमूताईला जाणवू लागला. त्याहून तिला खटकू लागलं ते पियूच्या पोस्टवरचं ढेप्याचं वाढतं वावरणं. प्रत्येक पोस्टवर त्याची काही तरी प्रतिक्रिया असेच. कधी कधी तर तो फार फार आवडल्याचे लाल बदामही टाके. हे बदाम पाहिले की, नमूताईचा नुसता जळफळाट होई. पियू कोण हे कुणाला विचारलं, तर आपल्याला जळूबाई म्हणतील सगळे, असं वाटल्यामुळं गप्पच राहिली ती.

ढेप्या आणि नमूताईचा स्मार्ट संवाद बंद असल्यानं ग्रूपवर तशी शांतताच असायची हल्ली. कोणी कुणाला डिवचत नव्हतं की, कुणी चिडवत नव्हतं. हिरीरीनं भांडणंही होत नव्हती. धर्मग्रंथीच्या एका पोस्टवर नमूताईनं शंका विचारली. धर्मग्रंथीनं तिला ‘Oh! You Nurd’ असं हिणवलं. नमूताईला कुणी काही सुनावल्याचं वाईट वाटलं म्हणून नाही, पण Nurd शब्दामुळं ढेप्या चिडला. धर्मग्रंथीला सुनावताना त्यानं लिहिलं, तुला उत्तर माहीत नसलं, तर तसं कबूल कर. Nurd म्हणून हिणवत तूच ते असल्याचं सिद्ध केलंस. त्यावर तुला का रे बाबा एवढा पुळका?’ असं तिनं शहाजोगपणे विचारलं. पण कुणीच तिकडे लक्ष नाही दिलं. ढेप्यानं आपली बाजू घेतल्याचं पाहून इकडे नमूताईला बरंच बरं वाटलं.

व्हॉट्सॲपीय संवाद बंद असला, तरी त्याची कल्पना नमूताई आणि ढेप्या, दोघांच्याही घरी नव्हती. ढेप्या प्रमोशनसाठी परीक्षा देत होता आणि नमूताईची पीएच. डी.ची तयारी अंतिम टप्प्यात. त्यामुळंच दोघं आपापल्या व्यापात दंग आहेत, असं घरच्यांना वाटत होतं.

त्या दिवशी नमूताई खूश होती. तिचा पीएच. डी.चा प्रबंध मान्य झाला होता. आता फक्त पदवी मिळणंच बाकी. तिच्या हिटलरनं मोठ्या आनंदानं ढेप्याच्या आईला ही बातमी कळवली आणि म्हणाली, आता मार्ग मोकळा झाला हो बाई. घ्या एकदा बोलवून तुमच्या घरी कायमचं. हा फोन चालू असतानाच नेमकं ढेप्यानं थोडं ऐकलं आणि काय झालं असावं, याचा त्याला अंदाज आला.

ढेप्याच्या हिटलरनं फोन केला तेव्हा नमूताई बाबांबरोबर बाल्कनीतच चहा पित उभी होती. तुमचा जावई परीक्षा पास झाला. आता मोठं प्रमोशन मिळणार, असं त्यांनी सांगितल्याचं नमूताईच्या कानावर पडलंच.

NDAवर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलीच पोस्ट होती ढेप्याची - आपल्या सर्वांच्या लाडक्या नमूताई आता नावामागं डॉ. लावण्यास पात्र झाल्या. मित्रों, आपण अभिनंदन करू त्यांचं...’ ✊ 👌 👌 👌

या पोस्टमधलं मित्रों नमूताईला खटकलं नाही. आपणच आपल्या पीएच. डी.ची पोस्ट टाकून जाहिरात कशी करायची, हा तिचा प्रश्न आपोआप सुटला. ढेप्याला आपल्याबद्दल अजूनही काही वाटतं, हे कळून ती मनातल्या मनात खुलली.

पुढच्याच क्षणी तिनं पोस्टायला सुरवात केली - ढेप्याकडून खरे खरे पेढे मागवा रे. पप्पू असूनही बँकेचा रिजनल मॅनेजर झालाय तो!’ 👏 👏 👏

एकामागोमागच्या या दोन पोस्टनं वातावरणच बदललं. ग्रूपवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. ते गुलाब 🌹🌹, ते गुच्छ , ते अंगठे 👍 👌 पाहत असतानाच नमूताईचा फोन वाजला. ढेप्याच होता तो.

थोडा वेळ बोलणं झाल्यावर नमूताईला पियूची आठवण झालीच. तिनं थोडं घुश्शातच विचारलं, ‘‘काय म्हणतेय रे ढेप्या तुझी ती पियू? तुझं अभिनंदन करायला आली नाही वाटतं आज.’’

हे ऐकून ढेप्या हसतच सुटला. ते आवरताना त्याचा आय-फोनही हातातून पडला. हसू आवरून तो म्हणाला, ‘‘नमूताई, अगं ती पियू नाही गं; तो पियू. पीयूष जाधव आहे तो! शोनूबाळाच्या मित्राचा मित्र, प्राध्यापक पीयूष.’’

त्यानंतर दोनच दिवसांनी चतऱ्यानं ग्रूपवर स्फोट घडवला... आजची रीअल ब्रेकिंग न्यूज म्हणत त्यानं लिहिलं ढेप्या-नमूताईचं शुभमंगल दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी. दोन्हीकडच्या हिटलरांचा ग्रीन सिग्नल. बिघाडी संपून आघाडी अधिक दमदार. वाजव रे डीजे...तुला आघाडीची शप्पत!’ 💒  ✅ ✅ 💃 🎷 🎷 🎷
----------
(नगर जिल्हा वाचनालयानं आयोजित केलेल्या पद्माकर डावरे राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत तिसरं बक्षीस मिळालेली ही कथा. देवाशप्पथ खरं सांगतो, स्पर्धेत फक्त तिघांनीच भाग घेतला नव्हता हो! एकूण ७४ कथा त्यासाठी आल्या होत्या.)


गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

न मिळताच झालेली छोटीशी मुलाखत



स्वातंत्र्यदिन संपता संपता रात्री उशिरा बातमी कळली - अजित वाडेकर गेले. ते त्या अर्थाने माझ्या पिढीचे नायक क्रिकेटपटू नाहीत. आवडीनं क्रिकेट पाहायला - म्हणजे आकाशवाणीवरची कॉमेंटरी ऐकायला नि वृत्तपत्रांतल्या बातम्या वाचायला शिकलो, तेव्हा वाडेकर खेळत नव्हते. 

कॉमेंटरीमधले धावांचे आकडे सोडले, तर बाकी काही कळायचं नाही, तेव्हाची गोष्ट सांगतोय. तर वाडेकरांनी तेव्हा निवृत्ती जाहीर केली होती. अगदी नुकतीच. इंग्लंडचा ‘तो’ दौरा संपला होता. सर्व बाद ४२ असा ‘पराक्रम’ भारताच्या नावावर नोंदला गेला तो याच कुप्रसिद्ध दौऱ्यात. वाडेकर-बेदी वाद सुरू झाले म्हणतात, ते याच दौऱ्यात. बरंच वाईट लिहिलं जात होतं, ते याच दौऱ्याबद्दल. बॅटच्या स्वरूपातील विजय स्तंभावर दगडफेक वगैरे, भारतीय क्रीडाप्रेमींचे लाडके प्रकार करून झाले होते. त्यानंतर लगेचच क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालचा वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. ती संधी साधून लगेचच वाडेकरांनी मदतनिधी सामना मिळवला. ते निवृत्त झाले आणि मन्सूरअली खान पटौदी पुन्हा एकदा भारतीय संघाचे कर्णधार बनले. एक वर्तुळ पूर्ण झालं. पटौदींचं कर्णधारपद काढून वाडेकर. आणि त्यांच्यानंतर पुन्हा पटौदी. सुनील गावसकर नावाचा दबदबा तेव्हा सुरू झाला होता. भारतीय फिरकीचा चौकोन जोरात होता.

खेळत नसले, तरीही ‘अजित वाडेकर’ नाव माहीत होतं. त्याबद्दल प्रेम होतं आणि कौतुकही वाटत होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं वेस्ट इंडिजला तिथल्या बेटांवर धूळ चारली आणि त्याच वर्षी ‘गणपतीबाप्पा मोरया...’ म्हणत इंग्रजांना त्यांच्या भूमीवर खडे चारले होते. इंग्लंडच्या त्या दौऱ्यावर बाळ ज. पंडित यांनी लिहिलेलं ‘१९७१चा पराक्रमी दौरा’ हे पुस्तक वाचलं होतं. त्यामुळेच वाडेकर तेव्हा खेळत नसले, तरी ते ‘अनोळखी’ राहिले नव्हते. वाडेकर, सोलकर, एंजिनीअर यांच्या चपळ क्षेत्ररक्षणाच्या किती तरी दंतकथा आम्ही मित्र एकमेकांना डोळे मोठे करून पुनःपुन्हा सांगत होतो आणि चेहऱ्यांवर उद्गारवाचक चिन्हं आणत होतो.

त्याच काळात ‘क्रीडांगणचा दिवाळी अंक वाचण्यात आला. तेव्हा ते मासिक होतं. त्यात ‘वाचकांच्या प्रश्नांना अजित वाडेकरांची उत्तरं’ असं काहीसं सदर होतं. एका वाचकानं विचारलं होतं, ‘क्रिकेटपटूंनी केस वाढवावेत का?’ वाडेकरांनी नेमकं काय उत्तर दिलं होतं, ते आता आठवत नाही. पण त्यात त्यांनी एकनाथ सोलकरचा उल्लेख केला होता. ‘केस लांब असले म्हणजे खेळ तेवढाच चांगला होतो, असं काही नाही,’ अशा आशयाचं उत्तर देताना त्यांनी बिशनसिंग बेदी यांच्या लांब केसांचा उल्लेख केला होता. बेदींना टोमणावाडेकर आणि बेदी यांच्यातील वाद इंग्लंड दौऱ्यात गाजले होतेच. पण त्या दोघांमध्ये खरोखर, अगदी आपल्या गल्लीतल्या पोरांसारखं भांडण असल्याचा बोध त्या उत्तरावरून अस्मादिकांनी करून घेतला.

किशोरनं बहुतेक त्याच वर्षीच्या दिवाळी अंकात ‘मोठ्यांचं बालपण’ हा विषय घेतला होता. त्यात वाडेकर होते. त्यांचे लहानपणीचे किस्से वाचायला मिळाले. त्याच एक-दोन वर्षांत कधी तरी विविध भारतीवरून त्यांचा आवाजही ऐकायला मिळाला. 'क्रिकेट विथ विजय मर्चंट' हा अडीचचा कार्यक्रम झाला की, दर रविवारी दुपारी तीन वाजता ‘फौज़ी भाईयों के लिए’ विविध भारतीचा ‘विशेष जयमाला’ कार्यक्रम असे. त्यात सेलेब्रिटी एक तास बोलत आणि आपल्या आवडीची गाणी ऐकवत. वाडेकरांच्या पत्नीचं नाव रेखा असल्याचं त्याच कार्यक्रमातून कळलं. ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू...’ हे तेव्हाचं सुपरहीट गाणं त्यांनी पत्नीचं नाव घेऊन ऐकवल्याचं आठवतंय. पक्कं!

अजित वाडेकर यांची कधी भेट होईल, हे स्वप्नातही आलं नव्हतं. किंबहुना तसं स्वप्न वगैरे काही पाहिलंही नव्हतं. लहान असताना पुण्यात स्टेट बँकेचे आंतरविभागीय क्रिकेट सामने पाहिले होते. तिथं पीवायसीच्या किंवा जिमखान्याच्या मैदानावर गुंडप्पा विश्वनाथ खेळताना दिसला. वाडेकर स्टेट बँकेतच. पण ते बहुतेक आजारी असल्यामुळं खेळत नव्हते म्हणे.

पण वाडेकर यांची भेट होणं, त्यांच्याशी दोन-पाच मिनिटं बोलणं माझ्या नशिबात सटवाईनं लिहून ठेवलेलं होतं. फार वर्षांपूर्वीची गोष्ट ही. माझी पत्रकारिता सुरू झाली तेव्हाची. ते वर्ष १९८९ असावं. रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अजित वाडेकर नगरला आले होते. क्लबचे अध्यक्ष स्टेट बँकेचे मोठे  अधिकारी होते. वाडेकर त्याच बँकेत खूप वरिष्ठ अधिकारी. सरव्यवस्थापक किंवा तत्सम पदावर. भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदाच्या भूमिकेत जायला वेळ होता अजून त्यांना. निवडसमितीमध्ये तर फार नंतर होतेे ते.

वाडेकर नगरमध्ये येतात म्हटल्यावर माझ्यातल्या हौशी क्रीडा पत्रकाराला उबळ आली. कार्यालयीन वेळ सोडून करण्याचं हे काम आवडीनं अंगावर घेतलं होतं. वाडेकर यांना भेटलंच पाहिजे, त्यांची मुलाखत घेतलीच पाहिजे. ते आपलं कर्तव्यच आहे, असं वाटलं. आता त्यांना भेटायचं म्हणजे कसं नि कुठं? अगदीच नवखा असल्यामुळं 'सोर्सेस' वगैरे म्हणतात, ते नव्हते. कार्यक्रम ज्या वेळेत होता, ती वेळ कार्यालयात बसून काम उरकण्याची. कमी मनुष्यबळाच्या कार्यालयात काम करण्याचं हे मोठं दुःख. त्यानं नेहमीच साथ दिली. (त्याची दुसरी चांगली बाजू म्हणजे, कुणावाचून काही अडत नाही! एकट्याच्या बळावर काम रेटायचं शिकतो माणूस.)

कसंबसं काम संपवून कार्यालयातून पळ काढला आणि कार्यक्रमस्थळी गेलो. म्हणजे सहकार सभागृहात. तिथं पोहोचल्याबरोबर कळलं की, कार्यक्रम कधीच संपला. वाडेकरसाहेब आता जेवायला गेले. हे जेवायचं स्थळ म्हणजे एक क्लब. खास मेंबर लोकांचा क्लब. तो शहरापासून बऱ्यापैकी लांब.

'जिथं शहाणे जायला घाबरतात, तिथं मूर्ख बेधडक घुसतात,' या उक्तीला अनुसरून थेट त्या क्लबच्या दिशेनं सायकल हाणली. वाडेकर भेटणारच, असं वाटत होतं. पण बोलतील का? मनात ती शंका मात्र होती. कार्यालयातून निघताना शहाणपणा केला होता - वाडेकरांना विचारायच्या प्रश्नांची यादीच केली होती. न्यूजप्रिंटवर लिहिलेली. 

क्लबवर पोहोचलो. रोटरी क्लबच्या स्थानिक अध्यक्षांना भेटून ओळख वगैरे सांगितली. परप्रांतातले होते साहेब. स्टेट बँकेचा नगरमधला सर्वांत मोठा अधिकारी. माझ्या फाटक्या अवताराकडे पाहूनही त्यांनी काही शंका घेतली नाही. वाडेकरसाहेब जेवत आहेत. हात धुवून येतील एवढ्यात,’ असं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर दोन-पाच मिनिटांत साक्षात अजित वाडेकर आले. वातावरण क्लबमध्ये असावं तसंच होतं. हिरवळमंद प्रकाश वगैरे. वाडेकरांना पाहून आपण सेलेब्रिटीला भेटतोय असं काही वाटलंच नाही. जेवण झाल्यानं तेही निवांत होतेप्रसन्न दिसत होते. मुलाखत पाहिजे म्हटल्यावर एकेरी नावानं उल्लेख करून म्हणाले, ‘‘सतीशआता या वेळी मुलाखत घेणं तुला तरी योग्य वाटतंय का सांग...’’

माझा चेहरा उतरला असावा खर्रकन आणि अजित वाडेकरांना ते मंद प्रकाशातही दिसलं असावं. माझी समजूत काढावी, असं त्यांनी ठरवलं बहुतेक. एक उपाय सुचल्याच्या सुरात ते म्हणाले, ‘‘एक काम कर. तू काढलेल्या प्रश्नांचा कागद दे मला. मी मुंबईला गेल्यावर त्याची उत्तरं लिहून ती सिंगसाहेबांकडे पाठवीन.’’ सिंगसाहेब म्हणजे स्टेट बँकेचे ते अधिकारी. मला तेवढ्यापुरतं खूश केलं त्यांनी.

‘‘कुठं काम करतोस?’’, असंही विचारलं वाडेकर यांनी. उत्तर ऐकल्यावर म्हणाले, ‘‘अरेतुझ्यासारखा एवढा चांगला मुलगा नि तिथं काय काम करतोस! मी त्या ह्यांना सांगून तुला त्या पेपरमध्ये घ्यायला लावतो.’’ त्यांनी त्या वेळी घेतलेल्या नावाचा वृत्तपत्रसृष्टीत दबदबा होता आणि त्यांचं दैनिकही फार मोठं मानलं जाई.

अजून थोड्या गप्पा-गोष्टी रंगल्या. सर्जेराव घोरपडे यांनी ‘क्रीडांगण’ मोठ्या हौसेनं सुरू केलं होतं. ते मासिक असताना त्याच्या संपादकीय किंवा सल्लागार मंडळात अजित वाडेकर होते. ‘क्रीडांगणमध्ये दीड वर्ष काम केल्याचं वाडेकरांना मी सांगितलं. त्या काळात मराठीत क्रीडा पाक्षिकांची लाट आली होती. एकाच वेळी चार पाक्षिकं प्रसिद्ध होत - पुण्यातून दोन आणि दोन मुंबईतून. त्यातल्या एका पाक्षिकाचे संपादक म्हणून अजित वाडेकर यांचं नाव झळकत असे. भारतात झालेल्या रिलायन्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर त्या भरतीच्या लाटेला ओहोटीही लागली. संपादक म्हणून वाडेकर यांचं नाव मिरवणारं पाक्षिकही बंद पडलं. त्याबद्दल मी विचारलं. ‘‘अरेआपल्या मराठीत काय, तशीच नावं टाकतात...’’ असं काहीसं म्हणत त्यांनी त्या विषयावर फार बोलणं टाळलं. आता बोलणं वाढवण्यासारखं फार काही राहिलं नव्हतं. त्यामुळं त्यांच्या हातात हात देऊन निरोप घेतला...

मुलाखत दहा मिनिटांत संपवून आम्ही परत सायकलच्या पॅडलवर जोर मारत  गावात. उशीर झाल्यामुळं मेस बंद झाली होती. आता खिशातले पैसे खर्च करून बाहेर हातगाडीवर काही तरी खाणं भाग. मुलाखत न मिळाल्याची खंत होतीच...

वाडेकर यांच्यासारख्या व्यग्र माणसाला, सेलेब्रिटी क्रिकेटपटूला एका छोट्या शहरात, एका रात्री, पाच मिनिटांसाठी भेटलेल्या एका छोट्या पत्रकाराची आठवण राहणं अवघडच. त्यामुळं माझ्या प्रश्नांना त्यांच्याकडून काही लेखी उत्तरं आलीच नाहीत. त्यांना पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करणं शक्य होतं. पण ते काही लक्षात आलं नाही.

आता रात्री वाडेकर यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर हे सगळं पुन्हा आठवलं. तब्बल २९ वर्षांनंतरही लक्षात राहिलेल्या आणि पुढंही नेहमी लक्षात राहतील एवढ्या गोष्टी त्या पाच-दहा मिनिटांनी दिल्या. त्या अशा - अजित वाडेकर यांना अगदी थोडा वेळ का होईना थेट भेटण्याचं, त्यांच्याशी बोलण्याचं भाग्य मला लाभलं. भारताचा लाडका आणि यशस्वी कॅप्टन असलेल्या माणसाच्या हातात हात मिळवता आलात्यांनी एकेरी नावानंआपुलकीनं हाक मारली. उगीच आढेवेढे न घेतामुलाखत आता कशी शक्य नाहीहे प्रांजळपणे सांगितलं. त्या छोट्याशा संवादाच्या वेळात त्यांनी मला आपणहून नव्या, चांगल्या नोकरीचं आश्वासन दिलं होतं. आणि माझ्या ढोबळ, टपोऱ्या हस्ताक्षरातला न्यूज प्रिंटचा तो पिवळा कागद काही काळ का होईना वाडेकरांजवळ राहिला. त्या रूपाने मीच त्यांच्या बरोबर आणखी बराच काळ होतो की.

... या छोट्या आणि अविस्मरणीय अनुभवाबद्दल, मनापासून आभार अजित वाडेकर!

(छायाचित्रं - द न्यू इंडियन एक्सप्रेस आणि एशियन एज यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

हिमा दास आणि बुधिया...

अगदी एक दिवसाच्या फरकानंच त्या दोघांची ओळख’ झाली. ती दोघंही साधारण एकाच वयोगटातली. समाजातल्या वंचित घटकांमध्ये जन्मलेली-वाढलेली. त्यांच्या राज्यांचीही ओळख पुढारलेली-प्रगतिशील म्हणून नक्कीच नाही. त्यातली हिमा दास आसामची आणि बुधियासिंह ओडिशाचा. हिमाची ओळख तिनं जिंकलेल्या सुवर्णपदकामुळं. बुधियासिंह कळला तो सौमेंद्र पढी यांच्या चित्रपटामुळं.

टँपेअर जागतिक युवा अॅथलेटिक्स स्पर्धेच्या १० अविस्मरणीय क्षणांमध्ये हिमाची धाव जाऊन बसली आहे.

अखेरच्या १०० मीटरमध्ये हिमाने मुसंडी मारत सुवर्णपदक जिंकलं.
हिमा दास असं संगणकाच्या पडद्यावर टंकित केलंकी या १८ वर्षांच्या मुलीचे हजारो संदर्भ गुगल’ समोर ओततं. बुधियासिंह १६ वर्षांचात्याच्याबद्दलही बरीच माहिती मिळतेपण तो दोन वर्षांपासून काय करतोकुठं आहे याचा पत्ता त्यातून लागत नाही. हिमाच्या यशाची बातमी १३ जुलै रोजी देशभर झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दूरदर्शनच्या डीडी नॅशनल’ वाहिनीनं बुधिया सिंग - बॉर्न टू रन’ चित्रपट दाखवला. एक सुखावणारी यशोगाथा आणि दुसरी काळीज कुरतडत राहणारी व्यथा!
धावता धावता बुधियासिंह का थांबला नि कुठं गायब झाला?
... हिमाची अभुतपूर्व कामगिरी आणि बुधियासिंहचा थबकलेला प्रवास वाचून-ऐकून-पाहून जे वाटलं ते हे. हा जोड लेख झी मराठी दिशाच्या २८  जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाले. त्याचे दोन दुवे सोबत दिले आहेत.

बुधवार, ४ जुलै, २०१८

सविनय कायदेभंग!

('संजू'निमित्त पाच वर्षांपूर्वीचं, २५ मार्च २०१३ रोजी लिहिलेलं हे पद्य नसलेलं गद्य पुन्हा सादर. संजूबाबाला तुरुंगात जावं लागणार, या कल्पनेने भल्याभल्यांचं काळीज तेव्हा पिळवटून गेलं होतं.)
------------------------------------
आई-बापाविना बिचारा पोर।
टपले त्याला ठरविण्या चोर।
थोरा-मोठ्यांच्या जिवाला घोर।
कसा बा अडकला।।

आई त्याची मदर इंडिया
तात जणू फादर इंडिया
हा तर सन ऑफ इंडिया
तळपत सदा राहो।।

दिधली कोण्या दादाने संदूक।
खेळत होता खेळ दंबूक दंबूक।
अचानक तिची झाली बंदूक।
पाशी कैसा फसला।।

चक्रव्यूहात सापडे अर्जुन
आता लागला मार्गा सज्जन।
त्यजुनि व्यसने करितो भजन।
गांधीबाबा की जय।।

तरुणाईत पाऊल पडले वाकडे।
विसरूयात सारे आपण गडे।
भद्रजनांचे अवघ्या साकडे।
माफ करा तया।।

सपा, काँग्रेस नि राष्ट्रवादी
विसरून आपसांतील वादावादी।
म्हणती सावरून घ्या, द्या एक संधी।
बाळ ते निरागस।।

न्यायाचा हाती होता तराजू।
असे कोणी मार्कँडेय काटजू।
तयांचीही असे दयेची आरजू।
वाचाळले कधीचे।।

डिग्गीराजा, जया, गुड्डी, सिन्हा।
वात्सल्याचा तयांना फुटला पान्हा।
महाभारती या सारे बनले कान्हा।
पोपट सारे मिठू, मिठू।।

कसला भारी तो अॅक्टर।
मुन्नाभाई बने डॉक्टर
बापूंचा सिनेमॅटीक फॅक्टर।
लगे रहो, लगे रहो।।

कारागृही जर बाबाजाईल।
नुकसान कोटी कोटीचे होईल।
दुनिया चंदेरी काळवंडून जाईल।
ध्यानी जरा घ्या ना।।

निर्माते, दिग्दर्शक नि नट।
कसे भरतील मग पोट?
पिक्चरांची लागेल वाट।
चित्र काळेकुट्ट।।

असशील माझ्या देशा महान।
परि तू बॉलीवूडहून खूप लहान।
आता तरी पटवून घे ही खूण।
ओळख स्वतःला।।

झाले होते बॉम्बस्फोट खरे।
दगावली होती कर्ती-बाया-पोरे।
कशाला आठवावे जुने सारे?
जखम वाहे भळभळा।।

कसली शस्त्रे? कसला कायदा?
पाळून कोणाचा झालाय फायदा?
आता हवा आहे एकच वायदा।
पोराला सोडावे।।

जुने जाऊ द्या मरणालागुनि।
जाळुनि किंवा टाका पुरुनि।
केशवसुत ते गेले सांगुनि।
आठवा जरा।।

- ‘कायद्याशी सविनयआम आदमी

आगीत वितळला बर्फ

  ....................................... इंग्लंडमधल्या उपान्त्य सामन्यासारखं अहमदाबादेत झालं नाही. इथे आगीची आच लागताच बर्फाचं पाणी पाणी झा...