शुक्रवार, ६ मार्च, २०२६

रडतखडत आणि कण्हत-कुथत!

 


अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद.
मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच...
...........
भारतीय संघ जिंकला! धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!
संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो.
सामन्याचा हीरो होता जेकब बेथल
!
ह्या विजयामुळे भारतीय संघ अंतिम फेरीत गेला आहे,
 तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या
अडचणींचे ओझे बरोबर घेऊनच
!
--------------------------

सांगा कसं जिंकायचं?

अडीचशे धावा केल्यानंतर अगदी हसत-खेळत, प्रतिस्पर्ध्याला दमवत, आक्रमक खेळत?

वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघ जिंकला! कसा? तर धापा टाकत, दमत, कण्हत आणि कुथत!!

टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा पहिला उपान्त्य एकतर्फी झाला आणि दुसरा त्याच्या अगदी टोकाचा. क्रिकेट संकेतस्थळांचे मॅच प्रेडिक्टर भारताच्या विजयाची हमी देणारी कोणतीही टक्केवारी दाखवत असोत; ही लढत शेवटच्या दोन षट्कांपर्यंत अतिशय चुरशीची झाली.

हा सामना मुंबईऐवजी पर्थ किंवा अ‍ॅडलेड येथील मैदानांवर, द लॉर्ड्स किंवा ओव्हलच्या स्टेडियमवर, कोलंबो किंवा कँडी... असा अन्य कोठे खेळला गेला असता, तर हाच निकाल लागला असता का? ह्याचं उत्तर देणं मोठं कठीण आहे. घरच्या मैदानावर, नेहमीच्या वातावरणात खेळताना सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांची मोठी दमछाक झाली. कशीबशी अंतिम फेरी गाठली ह्या संघाने. हा निकाल दिलासा देणारा नक्कीच नाही. उलट अंतिम सामन्यासाठी इशारे देणारा असा हा विजय आहे.

ह्या तीनच दिवसांत सर्वांचा लाडका ठरलेला संजू सॅमसन ह्याची सामन्याचा मानकरी म्हणून भले निवड झाली असो. सामन्याचा हीरो होता जेकब बेथल!

संजू सॅमसन चांगलाच खेळला. सलग दुसऱ्या सामन्यातील त्याच्या अर्धशतकामुळे (आणि हुकलेल्या दुसऱ्या शतकाची चुटपुट लावणाऱ्या खेळीमुळे) भारताला इंग्लंडविरुद्ध धावांचा डोंगर उभा करता आला.

निर्णायक लढतीत भारताने मिळविलेल्या विजयात संजूचा वाटा मोठाच. पण ह्या उत्तुंग धावसंख्येचा पाठलाग निडरपणे करणारी जेकबची खेळीही तेवढीच महत्त्वाची.

संजू सलामीला आलेला. जेकब चौथ्या क्रमांकावर. दोन गडी झटपट बाद झाल्यावर. दडपणाखाली. संजूच्या ८९ धावा ४२ चेंडूंमध्ये. जेकबने ४८ चेंडूंमध्ये १०५ धावा केलेल्या. त्या करताना आपण लढतीतून अजून बाहेर पडलो नाही असा समोरच्या सहकाऱ्याला दिलासा देणाऱ्या. योगायोग असा की, ह्या दोघांचेही चौकार व षट्कार समान – आठ आणि सात. ह्याचा दुसरा अर्थ असा की, संजूपेक्षा जेकब एकेरी-दुहेरी धावा अधिक पळाला. तेही धावांचा पाठलाग करताना.

पहिल्या काही मिनिटांतच पाहुण्यांचा कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं संजूवर कृपा केली होती. डावातलं तिसरं षट्क टाकणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर हॅरीनं संजूचा झेल सोडलेला. त्या जीवदानाचा त्यानं पुरेपूर फायदा उठवला.

षट्कार मारण्याच्या प्रयत्नात संजू बाद झाला, तेव्हा संघाच्या दीडशेहून अधिक धावा झालेल्या. तेव्हा जवळपास सहा षट्कांचा डाव बाकी होता. अब तुम्हारे हवाले वतन साथीयों... असं म्हणण्याचं स्वातंत्र्य त्याला होतं.


आपल्या आधी दोन आणि समोर चार गडी बाद होत असल्याचे पाहणाऱ्या जेकबला ही मुभा नव्हती. संघ जिंकायचा असेल तर आपल्यालाच खेळावं लागेल, ह्याची जाणीव असल्यामुळं दुसरी धाव घेताना तो बाद झाला. त्या वेळी संघाला विजयासाठी २९ धावा आवश्यक होत्या. तो धावचित झाला आणि भारतीय संघानं खऱ्या अर्थानं निःश्वास टाकला.

बेथल सुदैवी नव्हता, असं नाही. त्याचं शतक साजरं झालं ते सुटलेल्या झेलाच्या षट्कारावर. पण अक्षर पटेल ह्यानं प्रयत्न करूनही न झालेला तो झेल अवघड होता. त्यात यश मिळतं तर अक्षरच्या नावावर आणखी एका अफ्लातून झेलाची नोंद झाली असती. त्याच्या अफाट क्षेत्ररक्षणाचा आजच्या विजयातील मोठा वाटा विसरता येणार नाही.

पहिल्या सहा षट्कांमध्ये बिनीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही इंग्लंड संघानं प्रयत्न सोडले नाहीत. ह्या झुंजारपणाला दाद द्यायलाच हवी. आणि ही कडवी झुंज दिली बेथलं ह्यानं.

विजयासाठी १८ चेंडूंमध्ये ४५ धावांची गरज असताना जसप्रीत बुमराह ह्यानं टाकलेलं अठरावं षट्क कमाल होतं. त्यात त्यानं फक्त सहा धावा दिल्या. नंतरच्या षट्कात पहिल्याच चेंडूवर बेथल ह्यानं षट्कार ठोकल्यानंतरही हार्दिकनं नऊच धावा दिल्या. शिवाय त्यानं सॅम करन ह्याला तिलक वर्माच्या हाती झेल द्यायला भाग पाडलं होतं. भारताचा विजय तिथे नक्की झाला होता. किती धावांनी?’, एवढाच प्रश्न होता.

अखेरच्या षट्कात हे अंतरही झपाट्यानं कमी झालं. आता सामना आपलाच ह्या समजुतीनं कर्णधारानं चेंडू शिवम दुबे ह्याच्या हाती सोपवला. वेस्ट इंडिजविरुद्ध दोनच षट्कांत ४६ धावांची खिरापत वाटणाऱ्या दुबेवर हा मोठाच विश्वास दाखवलेला. जोफ्रा आर्चर ह्यानं त्याला तीन षट्कार मारले. दुबेनं २२ धावा दिल्या. अर्थात त्यानं फलंदाजीत बढती मिळाल्यावर २५ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या, हे विसरता येणार नाही. पण षट्कामागे बावणेबारा धावा मोजणारा अक्षरही तेथे चालला असता.

ह्या सामन्यात ४० षट्कांत ४९९ धावा झाल्या. अनेक विक्रम रचले गेले. दोन्ही संघांकडून ३९ चौकार आणि ३४ षट्कारांची आतषबाजी झाली. मग गोलंदाजांचं काय? सामन्यात एकूण १२ खेळाडूंनी गोलंदाजी केली. त्यापैकी बुमराह व हार्दिक पंड्या ह्या दोघांनीच षट्कामागे दहापेक्षा कमी धावा दिल्या. फलंदाजांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून गोलंदाजांनी शिमगा करावा, हे काही योग्य नाही.

अहमदाबादेत विजेतेपदासाठी भारतीय संघाला चिवट न्यू झीलँडशी लढावे लागणार आहे. वरुण चक्रवर्तीनामक शस्त्र धार पूर्णपणे गमावून बसल्याचे दिसते. एक एकच सामना वाट्याला आलेले कुलदीप यादव व महंमद सिराज आणि चपळ क्षेत्ररक्षणामुळे मैदानात उठून दिसणारा रिंकू ह्यांचा संघात समावेश होईल का? काही दिवसांपूर्वी संजू सॅमसन ट्रोलरचे आवडते गिऱ्हाईक होते. त्याची जागा आता अभिषेक शर्मा ह्यानं घेतली आहे. अभिषेकला संघाबाहेर ठेवण्याचं धाडस कोणी करील? की एका स्फोटक खेळीच्या अपेक्षेवर त्याला पुन्हा संधी दिली जाईल?

इंग्लंडवर फक्त सात धावांनी विजय मिळविलेला भारतीय संघ अंतिम फेरीत गेला तो अनेक अनुत्तरित प्रश्न आणि डोक्याला खुराक देणाऱ्या अडचणी घेऊनच!

….

(छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद व भारतीय क्रिकेट मंडळ ह्यांच्या संकेतस्थळांवरून साभार.)

….

#टी20_विश्वचषक #उपान्त्य_सामना #भारत_इंग्लंड #संजू_सॅमसन #जेकब_बेथल #अक्षर_पटेल





रडतखडत आणि कण्हत-कुथत!

  अशक्य ते शक्य करण्याचा प्रयत्न आणि बेथल धावबाद. मोठा अडथळा दूर झाल्याचा आनंद भारतीय खेळाडूंना आवरता न येणाराच... ........... भारतीय संघ जि...