नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या
निमित्तानं अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं.
त्यातल्या तीन पिढ्यांमधल्या तीन खेळाडूंशी भेट झाली,
त्यांच्याशी थोड्या-फार गप्पा झाल्या.
दिवसाचं फलित हेच!
........................
सगळं काम संपवून शनिवारी रात्री अंथरुणावर पडता पडता मी मलाच समजा प्रश्न विचारला असता - ‘आजच्या दिवसाचं फलित काय?’ त्याचं साधं नि तेवढंच सोपं उत्तर (स्वतःलाच) दिलं असतं - ‘तीन अर्जुनवीरांची थेट भेट आणि थोड्या गप्पा!’
पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने नगरमध्ये आज जवळपास २५ अर्जुन पारितोषिक विजेते खेळाडू जमले. ध्यानचंद, द्रोणाचार्य पारितोषिकांचे मानकरी वेगळेच. त्यामध्ये ८७ वर्षांचे सदानंद शेट्टी होते आणि ह्याच स्पर्धेत चंडिगड संघाकडून खेळत असलेला पवन शेरावत हाही. द्रोणाचार्य पुरस्काराबरोबरच ‘पद्मश्री’ने सन्मानित हरयाणाच्या श्रीमती सुनील डबास ह्याही नगरच्या वाडिया पार्कवर संध्याकाळी उपस्थित होत्या.
दिग्गजांचा सत्कार
वाडिया पार्क मैदानावर शनिवारी स्पर्धेतील बाद फेरीचे सामने झाले. उपान्त्यपूर्व फेरीचे चार आणि त्या आधी हे संघ ठरविणारे आठ सामने. त्यातले किमान तीन सामने कमालीच्या चुरशीचे झाले. उपान्त्यपूर्व फेरीतील आठ संघ निश्चित झाल्यावर स्टेडियमवर एक छोटेखानी कार्यक्रम झाला. विविध पुरस्काराचे मानकरी असलेल्या खेळाडूंचा शानदार सत्कार.
त्यामध्ये ई. प्रसाद ‘कबड्डी’ राव, क्रिशनकुमार हुडा, शांताराम जाधव, राजू भावसार, रमा सरकार, माया आक्रे, विश्वजित पलित, हरदीपसिंग, पी. गणेशन, बी. सी. रमेश आणि अजून बरेच. ह्या सर्वांचा नगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला.
त्यातील तीन अर्जुनवीरांची दिवसभरात भेट झाली आणि थोडा वेळ गप्पाही रंगल्या. हे तिन्ही खेळाडू अगदी वेगळ्या पिढ्यांमधले. म्हणजे त्यांच्या वयातलं अंतर एवढं की, पहिला मैदान गाजवत होता, तेव्हा तिसऱ्याचा जन्मही झालेला नव्हता!
हे तिन्ही खेळाडू कबड्डीशी आजही संबंध टिकवून आहेत. आणि त्यांच्याबद्दलचं कबड्डीच्या चाहत्यांना आजही कुतूहल वाटतं. त्यांच्या सोबत फोटो काढावे वाटतात. थोडक्यात, त्यांचं ‘स्टारडम’ पूर्वीएवढंच कायम. किंबहुना त्यात अधिक भर पडलेली, थोडं अधिक परिपक्व झालेलं.
निर्मल थोरात ह्याचा सकाळीच फोन आला आणि अशोक शिंदे ह्यांना भेटायला जायचं ठरलं. चढाया, चपळाई आणि पदन्यास ह्याबद्दल अशोक शिंदे प्रसिद्ध. नगरमध्ये तीन दशकांपूर्वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा झाली, तेव्हा ते पुणे जिल्ह्याकडून खेळत होते. शांताराम जाधव, अशोक शिंदे ह्यांच्यासाठी निर्मलनं घरी खास जेवणाचा बेत आखला होता. त्यांच्या पंगतीला मीही होतो.
त्या वेळी शांतारामबापूंची घेतलेली ‘बोनस’ लाईनबाबत मुलाखत कबड्डी वर्तुळात बऱ्यापैकी गाजली होती. ‘केसरी’च्या इथल्या आवृत्तीत ती चक्क अग्रलेखाच्या शेजारी प्रसिद्ध झाली होती.
संघात आहे की नाही?
त्यानंतर थोड्याच काळाने पुण्यात झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अशोक शिंदे ह्यांचा खेळ पाहण्याची संधी मिळाली. पहिल्या सामन्यासाठी महाराष्ट्राचा जो संघ जाहीर झाला, त्यात अशोक शिंदे ह्यांचा समावेश नव्हता. प्रत्येक संघातील खेळाडूंची नावे आणि त्यांचे ‘चेस्ट नंबर’ ह्याची यादी संयोजन समितीकडून मिळे. त्या यादीत अशोक शिंदे ह्यांचं नाव नव्हतं. प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात झाली, तेव्हा ते खेळताना दिसले. त्याचा बातमीत स्वाभाविकच उल्लेख केला. तोच धागा पकडून हेमंत जोगदेव ह्यांनी कबड्डी संघटकांना दोन चिमटे आवर्जून काढले होते.
तेच हे अशोक शिंदे. आधी महाराष्ट्र बँकेत आणि नंतर ‘एअर इंडिया’मध्ये त्यांनी काम केलं. वर्षभरापूर्वीच त्यांनी निवृत्ती स्वीकारली. प्रो कबड्डी लीगच्या नव्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावणाऱ्या ‘पुणेरी पलटण’ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिलेली. सध्या ते त्या संघाचे ‘मेंटॉर’ आहेत. मग स्वाभाविकच त्यावर बोलणं झालं.
निवृत्तीनंतर आता त्यांना चिपळूण येथे कबड्डी प्रबोधिनी चालू करायची आहे. कोकणाबद्दलचं प्रेम, तिथं असलेली गुणी खेळाडूंची संख्या ह्यावर ते भरभरून बोलत होते. गुणवान खेळाडू शोधण्यासाठी त्यांची भटकंती चालूच असते.
नंतर थेट मैदानावर भेट झाली ती पंकज शिरसाट ह्याची. पालघरमध्ये पोलीस उपायुक्त असलेल्या पंकजशी संध्याकाळी फोनवर बोलणं झालं होतं. घरच्या मैदानावर होणाऱ्या स्पर्धेसाठी तो खास वेळ काढून आला होता.
नगरमध्ये वाढलेला, इथंच खेळायला शिकलेला आणि प्रा. सुनील जाधव ह्यांचं प्रशिक्षण मिळालेला पंकज फाऽऽर पुढे गेला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करीत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. मग भारतीय संघाचा कर्णधार बनला. अर्जुन पुरस्काराचा ह्या जिल्ह्याचा तोच पहिला मानकरी!
पंकजच्या ‘एक्सपर्ट कमेंट’
स्वाभाविकच पंकजला भेटण्यासाठी गर्दी झालेली. त्यात जुने मित्र, सहकारी खेळाडू, नव्या दमानं मैदानात उतरलेले... सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा. त्या गर्दीतून नजरानजर झाली आणि भेटण्यासाठी आम्ही दोघंही दोन-दोन पावलं पुढे सरसावलो. पुढे मग उपान्त्यपूर्व फेरीची महाराष्ट्र-कर्नाटक लढत त्याच्या शेजारीच बसून पाहिली. सामना अगदी जवळून पाहण्याचा आनंद त्याच्या ‘एक्सपर्ट कमेंट’मुळे अधिकच वाढला.
स्वाभाविकच पंकजला भेटण्यासाठी गर्दी झालेली. त्यात जुने मित्र, सहकारी खेळाडू, नव्या दमानं मैदानात उतरलेले... सगळ्यांचा त्याच्याभोवती गराडा. त्या गर्दीतून नजरानजर झाली आणि भेटण्यासाठी आम्ही दोघंही दोन-दोन पावलं पुढे सरसावलो. पुढे मग उपान्त्यपूर्व फेरीची महाराष्ट्र-कर्नाटक लढत त्याच्या शेजारीच बसून पाहिली. सामना अगदी जवळून पाहण्याचा आनंद त्याच्या ‘एक्सपर्ट कमेंट’मुळे अधिकच वाढला.
अर्जुन पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या पहिल्या महिला कबड्डीपटू म्हणजे शकुंतला खटावकर. त्यांना हा पुरस्कार मिळाला १९७८मध्ये; पंकजचा तेव्हा जन्मही झालेला नव्हता. ‘स्पर्धेसाठी कधी येताय?’, असं त्यांना मेसेज करून विचारलं होतं. त्यांचं काहीच उत्तर आलं नाही. पण संध्याकाळी त्या व्यासपीठावर दिसल्या. ह्या सगळ्या ज्येष्ठ खेळाडूंचे सत्कार अजून व्हायचे होते.
तीस वर्षांनंतर भेट
सत्कार स्वीकारून व्यासपीठाकडे परतत असताना त्यांना अडवलं. पाहताक्षणीच विचारत्या झाल्या, ‘‘सतीश कुलकर्णी ना? अहो, तुमचा फोनच लागत नाहीये...’’ जवळपास ३०-३२ वर्षांनंतर भेट होऊनही त्यांनी क्षणात ओळखलं. तोपर्यंत महाराष्ट्राच्या उपान्त्यपूर्व लढतीची घोषणा झाली होती. मग तो सामना आटोपल्यावरच भेटायचं ठरलं.
जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय नगरमध्ये आल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ आणि संघटनेच्या कामाची नव्यानं रुजवात करायची म्हणून निमंत्रितांची राज्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रा. शशिकांत गाडे, प्रा. सुनील जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दादा कळमकर ह्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केलं होतं.
त्या स्पर्धेसाठी राज्यातले बडे बडे संघ आले होते. शकुंतला खटावकरही आल्या होत्या. ती संधी साधून त्यांची मुलाखत घेतली. राष्ट्रीय पातळीवरचा एक नामांकित खेळाडू आणि स्थानिक दैनिकाचा एक तरुण पत्रकार असा संवाद होता तो.
बदल आणि आव्हानं
नव्या जमान्यात कबड्डीपुढं कोणती आव्हानं आहेत, कोणत्या बदलांना सामोरं जावं लागेल, हे खटावकर ह्यांनी त्या मुलाखतीमध्ये अगदी सविस्तर सांगितलं होतं. कोणकोणत्या देशांचं आव्हान भारतापुढं असेल आणि त्यासाठी काय करावं लागेल, ह्याबद्दल त्या बोलल्या होत्या.
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा मागच्या वर्षी नगरमध्ये झाली. मॅटवर खेळली जाणारी कबड्डी, खेळाडूंच्या पायात बूट, धावता गुणफलक... हे सगळे बदल पाहून आठवण झाली ती त्या मुलाखतीची.
स्पर्धेच्या निमित्तानं लिहिलेल्या लेखात मुलाखतीचा उल्लेख केला. कसं कोण जाणे, पण व्हॉट्सॲप कृपेने त्या लेखाची लिंक शकुंतला खटावकरांपर्यंत पोहोचली. त्या अगदी भारावून गेल्या. क्रीडा प्रशिक्षक अजय पवारच्या माध्यमातून फोन नंबरची देवाणघेवाण झाली आणि दीर्घ काळानंतर संपर्क सुरू झाला.
व्हॉट्सॲपवर नानाविध मेसेज शकुंतलाताई पाठवित असतात. असं असतानाही स्पर्धेसाठी नगरमध्ये येणार की नाही, हे त्यांनी का कळवलं नाही बरं?
ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष भेट झाल्यावर मिळालं. घरच्या काही अडचणींमुळे त्यांचं येणं निश्चित नव्हतं. पण ती समस्या आदल्या दिवशी काही प्रमाणात दूर झाली आणि एक दिवसासाठी त्या आपल्या आवडत्या जागी आणि जगी - कबड्डीच्या गजबजलेल्या मैदानावर आल्या.
‘पाय लागू...’
नगरनं उपान्त्यपूर्व फेरीत कर्नाटकाला सहज हरवलं आणि मैदानात जल्लोष चालू झाला. त्या जल्लोषी गर्दीतून वाट काढतच व्यासपीठाकडे गेलो. शकुंतला खटावकर वाटच पाहत होत्या. आम्ही बोलायला सुरुवात केली की, दोन खेळाडू आल्या. ताईंना ‘पाय लागू’ करीत त्या जुन्या सोनेरी आठवणींना उजाळा देऊ लागल्या. मग स्वाभाविकच फोटोही आला. त्या फोटोतून दूर होण्याचा प्रयत्न खटावकरांनी हाणून पाडला. ‘हे पत्रकार आहेत,’ अशी आपल्या विद्यार्थिनींशी ओळख करून दिली.
![]() |
(छायाचित्र - अनिल शाह) ------------------ |
सातारकर मंडळींना घरी येण्याचं आमंत्रण देताना म्हणाल्या, ‘‘पुणेकराचं आमंत्रण नाही बरं हे. पुण्यात (अनेक वर्षांपासून) राहत असले, तरी शेतकऱ्यांच्या कुटुंबातली आहे मी!’’ आडनावातील ‘खटाव’कडे त्यांचा अप्रत्यक्ष संकेत होता. पुन्हा निवांत भेटायचा वायदा करून आम्ही निरोप घेतला.
अशोक शिंदे ह्यांच्याशी गप्पा मारताना जाणवली ती त्यांची नवीन गुणी खेळाडू शोधण्याची धडपड. ‘आपल्या कोकणासाठी’ काही करण्याची तळमळ.
पंकज तर घरचाच माणूस. एकेरी संबोधनातला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं वजन आणि वलय बाजूला ठेवून महाराष्ट्राचा सामना समरसून पाहणारा. नेमक्या क्षणी खेळाडूंना सूचना देणाऱ्यां पंकजचं मैदानाशी तेच जुनं नातं कायम असल्याचं दिसलं.
भेटायला आलेल्या प्रत्येकाला ‘कसे आहात तुम्ही?’ असं शकुंतलाताई अगदी आवर्जून विचारत होत्या. गुरू, प्रशिक्षक, ताई ह्या नात्यानं संवाद साधत होत्या. बोलता बोलता त्यांनी एकाला ‘पाया कसं पडावं!’ ह्याचा धडा दिला आणि ‘आता नको. पुढच्या वेळी सांगितलं तसा नमस्कार कर...’ असंही सांगितलं.
... तीन पिढ्यामधील तीन खेळाडू. त्यांना जोडत आली आहे कबड्डी. त्या खेळाबद्दल तिघेही कृतज्ञ आहेत!
.....
#कबड्डी #अर्जुन_पुरस्कार #शकुंतला_खटावकर #अशोक_शिंदे #पंकज_शिरसाट #नगर #राष्ट्रीय_स्पर्धा #वाडिया_पार्क
.....
.....
#कबड्डी #अर्जुन_पुरस्कार #शकुंतला_खटावकर #अशोक_शिंदे #पंकज_शिरसाट #नगर #राष्ट्रीय_स्पर्धा #वाडिया_पार्क
.....