Monday 1 May 2023

मित्राची आठवण अन् आठवणीतला मित्र!


अचानक एखाद्या जुन्या मित्राची फाऽऽर आठवण येते. त्यानं पोटापाण्यासाठी गाव/शहर सोडलेलं असतं. त्या दूर देशी तो स्थायिक झालेला असतो.

अधूनमधून वर्गमित्र भेटतात. गप्पा होतात; खळखळून हसतो, तेव्हाही त्याची आठवण होते. त्याचं कसं चाललंय, मुलं काय करतात, ह्याची एकमेकांकडं विचारपूस होते. बस तेवढंच!

कधी तरी कुठल्या कामासाठी जाताना त्या भागातलं त्याचं घर दिसतं रस्त्यावरून. कुणीच राहात नसतं. त्या बंद घराकडे पाहून पुन्हा आठवतो तो दोन-चार मिनिटांसाठी. कामात गुंतल्यावर त्याची सय मनातल्या तळघरात जाते आपसूक.

अध्येमध्ये मित्राची गोष्ट कळते दुसऱ्या मित्राकडून, त्याच्या दूरच्या नातेवाइकाकडून. छान चाललेलं असतं. समाधानाची दोन उद्गारचिन्हं उमटवून वळतो आपल्या व्यापाकडे.

असंच कधी कधी त्याची आठवण टकटक करून जाते मनाच्या दारावर. ‘बोलू नंतर’, ‘शोधू नंबर’… आळस करतो थोडा.

आजच्यासारखा एखादा दिवस, त्याची कातर संध्याकाळ येते. खूपच आठवण येते मित्राची. कारण काहीच नसतं; पण बोलावं वाटतं.

पण संपर्क साधणार कसा त्याच्याशी?
पत्ता नाही, फोन नंबर नाही, इ-मेल आयडी माहीतच नाही…
बोलायचं तर आहेच.

अचानक लक्षात येतं, अनेक वर्षं न भेटलेला मित्र ज्या गावी राहातो, तिथंच आपला नव्यानं झालेला एक मित्र आहे की. विचारू त्याला ह्याचा काही ठावठिकाणा, पत्ता वगैरे.

पण तो ओळखत असेल का ह्याला? ती शक्यता कितपत? अंधूकच.  दोघांचं कामाचं क्षेत्र वेगळं. वयात बऱ्यापैकी अंतर. आपला मित्र वरच्या वर्तुळात वावरणारा. हा नवा मित्र सगळीकडे फिरणारा.

ऐकलं असेल का त्यांनी नाव एकमेकांचं? आला असेल का संबंध त्यांचा?

नशीब जोरावर असेल, तर भेटलेही असतील ते एकमेकांना. जग छोटंय म्हणतातच की.आशा वाटते.

चला, आता उशीर नको. नव्या मित्राला फोन लगेच करून जुन्या मित्राचा शोध घ्यायला सांगावं. त्याचा नंबर वगैरे मिळवून दे म्हणावं. काहीही कर, कुणाशीही बोल. त्याचा काही संपर्काचा मार्ग शोध. पण देच मिळवून त्याचा पत्ता. आज फाऽऽर फाऽऽर आठवण येतेय त्याची. ख्यालीखुशाली विचारायची आहे त्याला. इकडं का येत नाहीस? येतोस तेव्हा आम्हाला भेटत का नाहीस?

‘याद पिया की आए...’ ही ठुमरी आता मनातून बाहेर आली. ‘याद न जाए बीते दिनों की...’ हे गाणंही त्याला सांगायचंय.

नव्या मित्राला फोन केला तो खूप दिवसांनी. तरीही त्यानं पटकन् प्रतिसाद दिला. थोडं प्रास्ताविक केलं. एक छोटं काम आहे, असं सांगितलं. ते तुझ्याकडूनच होईल, अशी खातरी वाटत असल्याचंही मुद्दाम म्हणालो. ‘तुमच्या गावात अमूक अमूक नावाचा माझा मित्र राहतो. तो कुठं आहे सध्या, काय करतो... काही कळेल का? बघता जरा चौकशी करून?’

जग खरंच छोटंच आहे! आशा खरी ठरताना दिसतेय.

फक्त आडनाव सांगितलं आणि समोरून मित्राचं नावच घेतलं गेलं! तो कोणत्या कंपनीत काम करत होता, हेही सांगितलं. किती वेळा भेटी झाल्या, ह्याचाही तपशील पुरवण्यात आला. त्याच्या दोन-तीन वरिष्ठ सहकाऱ्यांची नावंही त्यानं धडाधड घेतली.

आश्चर्यच वाटलं. ह्याला माहीत असेल की नाही, ह्याची शंका. पण तसं काही नाही. ओळखतो तो त्याला. मग तुमची ओळख कशी वगैरे विचारलं. जुन्या मित्राशी असलेलं संबंध किती जुने, भेट होऊन किती काळ लोटला, कॉलेजजीवनात आम्ही कसे घट्ट मित्र होतो, त्याचे अगदी जवळचे नातेवाईक आमच्याच शहरातल्या मोठ्या उद्योगात वरिष्ठ पदावर असतानाही त्याचा मुळीच (गैर)फायदा न घेता तो बाहेर कसा गेला आणि तिथलाच कसा झाला... सगळं भडाभडा बोलत बसलो. त्याच्याशी संपर्क होणारच, हे नक्की झालं होतं ना!

जुन्या मित्राची नेमकी माहिती देण्यासाठी नव्या मित्राचा फोन उद्या किंवा दोन दिवसांनी येईल, असं धरून चाललो होतो. हा नवा मित्र बऱ्यापैकी संपर्क असलेला. आमच्या मित्राच्या उद्योगातील खूप जणांना ओळखणारा. त्यामुळेच त्याच्याकडून माहिती मिळेल, ह्याबद्दल निश्चिंत झालो.
पाचच मिनिटांत फोन आला. उत्कंठेनं उचलला.

नव्या मित्राकडं जुन्या मित्राबद्दल बातमी होती. अतिशय अनपेक्षित अशी.

‘ते आता ह्या जगात नाहीत. बरीच वर्षं झाली आता...’ धक्कादायकपणे त्यानं सांगितलं.
बरीच वर्षं? बारा-पंधरा वर्षं? छे, छे! अशक्यच!! तुमची बातमी चुकीची आहे. तुम्ही चुकीच्या माणसाबद्दल बोलताय बहुतेक.

त्याच वेळी धस्स झालं होतं. एवढी वर्षं आम्ही भेटलो नव्हतो? भेट जाऊ द्या; सव्वा-दीड तपापासून त्याची साधी माहितीही घ्यावी वाटली नव्हती आपल्याला?

पाच-दहा मिनिटं गेली आणि त्याचा पुन्हा फोन आला. आता आमच्या मित्राच्या अधिक जवळच्या माणसाकडून त्यानं माहिती मिळवली होती. मित्र गेला हे खरंच होतं; बऱ्याच वर्षांपूर्वी. त्याची आठवण येऊन कधी तरी उचकी लागायची, त्याच्याही आधी तो निरोप घेता झाला होता. त्याची पत्नीही दोन-तीन वर्षांपूर्वी देवाघरी गेली होती. एक मुलगा परदेशात आणि दुसरा परराज्यात असल्याची माहितीही नव्या मित्रानं दिली. त्यांच्या नावासह.

संपर्कात नसला म्हणून काय झालं?
इथं, त्याच्या जुन्या आणि मूळ गावी येत नसला म्हणून काय झालं?
चुकून कधी आलाच, तर आम्हाला भेटल्याविनाच परतला म्हणून काय झालं?
‘तो आहे’ आणि आज किंवा उद्या, कधी तरी भेट होईल; त्या वेळी गप्पा मारू, असा दिलासा होता. जेव्हा कधी भेटू, तेव्हा कडकडून मिठी मारू, साचलेलं सगळं बाहेर काढू, असं मनात होतं.

एक फोन केला आणि तो दिलासाच उद्ध्वस्त झाला!

आता वाटतंय, त्याच्या आठवणी येत होत्या, त्याला खूप दिवसांत भेटलो नाही, ह्याची लागणारी हंगामी चुटपूटच बरी होती.

फोन केला आणि काळीज कुरतडणारी सल देऊन गेला.

......

#मित्र #आठवणी #जुना_मित्र #नवा_मित्र #ललित
___

(छायाचित्रं महाजालावरून साभार)

4 comments:

  1. अशा तीव्रतेने येणाऱ्या आठवणी एकतर्फी नसतात, अशी माझी समजूत आहे. अर्थात हे सायन्सला मान्य नाही. पण सायन्स आणि भौतिक जग यापलीकडचा सृजनाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे तुमच्यापेक्षा तुमच्या मित्रालाच तुमची अधिक आठवण आली असण्याची शक्यता आहे.

    ह्या गोष्टींना पुरावा नाही आणि मिळणं शक्यही नाही. पण खोल ध्यानावस्थेत येणाऱ्या काही अवर्णनीय अनुभवांवरून ही शक्यता मी वर्तवत आहे.
    - डॉ. हेली दळवी, पुणे

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिखाण. आपल्या मनातील भावना अगदी योग्य शब्दांत तू नेहमीप्रमाणे मांडल्या आहेस.

    गत काळातील अशा कोणी मित्र-मैत्रिणीची आठवण झाली व काही अनपेक्षित बातमी त्याच्या बाबतीत मिळाली की, मन एकदम सुन्न होऊन जाते. काही दिवस त्याच्याच आठवणी रुंजी घालत राहातात. आपण अगोदरच भेटण्याचा का प्रयत्न केला नाही ही बोच मनाला लागून राहते. 🙏🏻
    - विकास पटवर्धन, नगर

    ReplyDelete
  3. 😔😔😔
    खूप छान लिहिलंय.
    - श्रीकांत देव, पुणे

    ReplyDelete
  4. अगदी ह्रदयस्पर्शी आठवण. मन हेलावून टाकणारी...

    एके काळी खूप खूप जवळचा असणारा मित्र काळाच्या ओघात दूर निघून जातो--- पुन्हा कधीही न भेटण्याएवढा दूर. फार यातना होतात मनाला अशा वेळी.
    - डॉ. विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...