(शीर्षस्थ
टिपा :
१
- अधिक स्पष्टीकरणासाठी कोणत्याही लेख-कथा-कादंबरीच्या तळाला टिपा देण्याची पंरपरा
आहे. तथापि सोशल मीडियाचं ब्रीदच ‘जुने जाऊ द्या
मरणालागुनि’ असल्यानं त्याला जागत वरतीच टिपा देत आहोत.
२
- या कथेतील पात्रं, प्रसंग आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, मनोरंजन आदी
कुठल्याही क्षेत्रातील घडामोडी यांचा वास्तवाशी काडीचा संबंध नाही. तसा तो
वाटल्यास योगायोग समजावा. न वाटल्यास कपिलाषष्ठीचा योग समजावा!
३
- कथेतील पात्रांना काही तरी नावं असावीत म्हणून ती दिली आहेत. अर्थातच, ‘नावं ठेवणं’ या आपल्या परंपरेला जागून ही नावं दिली
गेली आहेत.)
--------
थोडीथिडकी
नाही, तब्बल चार वर्षं होऊन गेली त्याला आता. आमच्या ग्रूपसाठी ‘अच्छे दिन’ आले होते. सच्चे दिन, अच्छे दिन!
ग्रूप
म्हणजे आमचा गटबिट नाही हो. नो गटबाजी तसली. आम्हाला ‘अच्छे दिन’ येण्याचं कारण निवडणुका, राजकारण, सातवा
वेतन आयोग, सेन्सेक्सची मुसंडी असलं काही भौतिक किंवा ईहवादी नव्हतं. ढेप्यानं आणले
होते हे अच्छे दिन आमच्यासाठी. त्याच्या जोडीला होती नमूताई.
ढेप्या
आणि नमूताईनं मिळून मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सॲप ग्रूप सुरू केला. ‘तू व्हॉट्सॲपवर आहेस ना?’, या सततच्या प्रश्नाला
सातत्यानं नकारार्थी उत्तर देऊन आपण मागास असल्याचं आणि टेक्नोसॅव्ही नसल्याचं जगजाहीर
होतं. त्यामुळं हळुहळू सगळ्यांनी अँड्रॉईड वगैरे स्मार्ट फोन घेऊन आपण काळाबरोबर
असल्याचं दाखवून दिलं.
तो काळ
व्हॉट्सॲप ग्रूपच्या साथीचा होता. साथीत जसे पटापट जातात, त्याप्रमाणं रोज एक से
बढकर एक ग्रूप सटासट तयार होत. फोनबुक पाहून लोकांना दणादण ॲड केलं जाई.
ढेप्या-नमूताई या साथीला बळी पडले. (अति)उत्साही वातावरणाचा परिणाम
झाल्यानंच त्यांनी ग्रूप सुरू केला. ढेप्या त्याचा आद्य ॲडमिन आणि नमूताई को-ॲडमिन.
त्यात त्यांनी आमचा अख्खा ग्रूपच घेतला. आमच्यातले काही शाळेपासूनचे मित्र,
काही कॉलेजमधले, काही नोकरीतले. काही मित्रांचे मित्र, काही मैत्रिणींच्या
मैत्रिणी. काही मित्रांच्या मैत्रिणी आणि काही मैत्रिणींचे मित्र. शेवटच्या दोन
प्रकारांतील मंडळींना ॲड करायला अनुक्रमे काही मैत्रिणींचा नि काही मित्रांचा
विरोधच होता. पण ॲडमिनद्वयीनं त्याला मुळीच किंमत दिली नाही. अच्छे दिनचा प्रभाव
असल्यानं ॲडमिन ढेप्याविरुद्ध कुणाची 'ब्र' काढायची हिंमत नव्हती. त्यामुळं ग्रूप
बराच मोठा झाला आणि त्यातली काही समीकरणं बदलली नि जोडीला नवी प्रकरणं निर्माण
झाली. पण ते खूप नंतरचं...
ढेप्यानं
‘Friends4Ever’ अशा नावानं ग्रूप सुरू केला आणि पहिलं
काम काय केलं, तर नमूताईला ॲड करून घेतलं. मग दोघांची फोनोफोनी झाली. पहिल्या १०
मिनिटांतच त्यानं आमच्यापैकी १७ जणांना ग्रूपवर इनव्हाईट केलं. त्यात अस्मादिकांचा समावेश होता. दिवसभर ढेप्या आणि
आमची ग्रूपबाबत बऱ्यापैकी चर्चा झाली. ऑफिसमधून घरी आल्यावर ढेप्यानं रात्रीत
पुन्हा ६० जणांना ‘फ्रेंड्स’मध्ये
घेतलं. तेव्हा ग्रूपची सदस्यसंख्या १८० वगैरे अशी मर्यादित होती. ढेप्या गंमतीनं
म्हणायला लागला, ‘व्हॉट्सॲपच्या इतिहासात आपला ग्रूप सगळ्यांत
मोठा. आपले सतराशे साठ मेंबर आहेत!’
आमच्या ॲडमिनद्वयीबद्दल
थोडं सांगायलाच हवं. ढेप्या आणि नमूताई अगदी बालवाडीपासूनचे मित्र. त्यांचे ‘हिटलर’ आणि त्यांची अर्धांगंही परस्परांचे मित्र. फक्त आपापले हिटलर कोण,
याबाबत त्यांचे थोडे मतभेद. ढेप्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या घरी तो मान
तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असलेल्या बाबांना. आणि नमूताईसाठी तिची बँकेत
व्यवस्थापक असलेली आई! तर ढेप्या आणि नमूताई अजून थोड्याच
दिवसांनी, त्यांच्या मते ‘वेल सेट्ल्ड’
झाल्यावर, ‘तुझ्या गळा-माझ्या गळा’
करणार, हे नक्की होतं. आम्हा मित्रांना माहिती होतं आणि दोघांच्या घरच्यांनाही. ‘हिटलर’ आणि त्यांच्या अर्धांगांना हे नातं मान्य असल्यामुळं
दोघांची थोडी पंचाईतच झाली. विशेषतः नमूताईची. पळून जाऊन आणि ‘हिटलर’च्या नाकावर टिच्चून ‘दोनाचे
चार’ करायचे होते तिला. त्यातलं थ्रिल एंजॉय करायचं होतं. पण
या जन्मात तरी ते शक्य नव्हतं. तिच्या आईच्या मते तर ती जेवढ्या लवकर ढेप्याच्या
घरी जाईल तेवढं बरंच.
‘ढेप्या’ हे काही त्याचं खरं नाव नाहीच मुळी.
साहित्याची आवड असलेल्या त्याच्या आईनं बाळाचं नाव मोठ्या कौतुकानं ‘दीपंकर’ ठेवलं. कॉलेजमध्ये गेल्यावर नमूताई त्याला लाडालाडानं
‘पेढा’ म्हणायची. नोकरीच्या
सुरुवातीच्या दिवसांत जिमबिम बंद झाल्यान ‘पेढा’ थोडा
सुटला; काहीसा बसका झाला. एकदा तो नसताना नमूताई
आमच्या ग्रूपमध्ये चुकून वाटणारं मुद्दामहून बोलून गेली, ‘पेढा
आता इतका सुटायला लागलाय की, गुळाच्या ढेपेसारखा दिसतोय.’
झालं! त्या दिवसापासून तो ढेप्या!
नमूताई
म्हणजे नम्रता. अधूनमधून, म्हणजे तासातली काही मिनिटं ती उद्धट वागायची. तिच्या मते
ते रोखठोक वागणं. तिच्या आईचं म्हणणं होतं की, तिच्या आणि बाबांच्या आयुष्यात दोन
महत्त्वाच्या चुका झाल्या होत्या - एक म्हणजे तिनं अशा मुलीची आई बनणं आणि दुसरी
सर्वांत महत्त्वाची ती ही की, अशा उद्धट, कुणाचंच न ऐकणाऱ्या पोरीचं नाव बाबांनी ‘नम्रता’ ठेवणं. ‘रोखठोक’ असूनही नम्रताला असं वाटे की, कुणाचं काही चुकलं, तर आपण त्याला समजावून
सांगावं. त्याच्या चुका मोठ्या मनानं पोटात घेतल्या पाहिजेत. त्यानुसार ती बऱ्याच
वेळा ‘ताई’च्या भूमिकेत जाऊन
ढेप्यालाही चार गोष्टी सांगी. त्याला वैतागून ढेप्यानंच तिला ‘नमूताई’ म्हणायला सुरुवात केली.
-------xxx------xxx-------
ग्रूपची
सुरुवात झाल्यावर पहिले काही दिवस ‘गुड मॉर्निंग’च्या पोस्ट नित्यनेमानं पडायला लागल्या. सकाळी १० वाजेपर्यंत १७-६०
मेंबरांचं गुड मॉर्निंग फुलांसकट व्हायचं. त्यातले काही अभ्यासू सुविचारही टाकायचे.
रात्रीनंतर ‘गुड नाईट-स्वीट ड्रीम्स’चा
रतीब सुरू व्हायचा. काहींच्या मते प्रत्येक पोस्टला 👍 👍 👍 किंवा 🙏 🙏 🙏 असं करून प्रोत्साहन देणं
त्यांचं कर्तव्यच. त्यांच्या अंगठ्यांना आणि नमस्काराला सगळेच वैतागले. पण सांगणार
कोण या सखाराम गट्ण्यांना?
शोनूबाळ म्हणजे
शौनक आमच्या ग्रूपमधला सगळ्यांत टेक्नोसॅव्ही. अर्थात हे त्याचं मत. असा व्हॉट्सॲप
ग्रूप त्यालाच सुरू करायचा होता. ढेप्यानं पहिल्या रात्री (म्हणजे ६०च्या दुसऱ्या
गटात) ॲड केल्यावर त्यानं पहिली पोस्ट टाकली ती अशी - खरं म्हणजे असा ग्रूप फॉर्म
करायचा म्हणून मीच महिनाभरापासून विचार करत होतो. पण ढेप्या ओके. तू सोपं केलंस
माझं काम. 👍
क्रेडिट
खायची सवय शोनूबाळाला पहिल्यापास्नं. इथंही तेच केलं त्यानं. वर ढेप्याला ग्रूप
कसा चालवावा आणि महत्त्वाचं म्हणजे काय खपवून घ्यायचं नाही, याचं लेक्चरही दिलं
फोन करून. ढेप्यानं सांगितलं म्हणून आम्हाला कळलं ते.
ग्रूप
सुरू झाल्यावर पहिल्याच आठवड्यात शोनूबाळानं ग्रूपचं नाव बदललं. त्यानं नामकरण
केलं, ‘NDA’! त्याच्या पुढची इमोजी - 💑
सरळ
नाकासमोर चालणाऱ्या ग्रूपमधल्या काहींना हे नामांतर का, ते काही कळलं नाही.
त्यांना वाटलं, लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएची सत्ता आल्यामुळं शोनूबाळानं हा बदल
केलाय. त्यांना समजून सांगण्यासाठी शोनूबाळानं
पोस्ट टाकली खास - ‘NDA’ म्हणजे ‘नमूताई, ढेप्या
अँड असोसिएट्स’. ‘असोसिएट्स’ म्हणजे आपण सगळे. नमूताई आणि ढेप्याचं जमल्यात जमा असल्यामुळं सगळ्यांना
हे नवं नामकरण आवडलं. ग्रूपवर हे अंगठेच्या अंगठे उमटले. ते कोण्या बाहेरच्यानं
पाहिले असते, तर त्याला वाटलं असतं, अशिक्षितांचा ग्रूप आहे हा!
गोड गोड बोलण्याचा,
एकमेकांची वाहवा करण्याचा महिनाभरातच सगळ्यांना कंटाळा आला. सज्जनपणाचे मुखवटे
काढल्यावर ग्रूपमध्ये खऱ्या अर्थानं मजा यायला सुरुवात झाली. प्रीतीनं ‘व. पुं.चे जीवनविषयक २३ विचार’ अशी पोस्ट, अर्थातच फॉरवर्डेड टाकली.
तेव्हा खेचाखेची सुरू झाली. ढेप्यानं लिहिलं - ‘व. पु. काळे
यांना मी लेखक म्हणून ओळखतो. ते तत्त्वज्ञही होते?’ 😕 😕 😕
नमूताईनं लगेच विचारलं - का लेखक तत्त्वज्ञ असू शकत नाही का? वाद नको म्हणून ढेप्यानं नमूताईचा हा प्रश्न ‘वेल लेफ्ट’ केला.
एका ‘सखाराम गटणे’नं ‘युनेस्कोनं भारताच्या राष्ट्रगीताची जगात सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली’, अशी पोस्ट टाकली. त्यावर शोनूबाळानं आधी खदाखदा हसून घेतलं. त्यानं लिहिलं,
‘अरे पप्पू! या युनेस्कोला असली काम
आहेत का बे? मी इ-मेल वापरतोय तेव्हापासून म्हणजे १०
वर्षांपूर्वी या असल्या इ-मेल वाचतोय.’ तंत्रज्ञान वापरण्यात आपण कसं सगळ्यांच्या पुढं आहोत, हे दाखवण्याची संधी
त्यानं इथंही नाहीच सोडली. वरतून ‘देशभक्ती म्हणजे कांजिण्या’ अशा अर्थाचं आईनस्टाईनचं काही तरी वाक्यही टाकलं. ढेप्यानं शोनूबाळाला
👐 👐 अशी सहमती दाखवत एक सुधारणा सुचवली, ‘बाळा, तो पप्पू नसून फेकू
आहे फेकू!’
‘फेकू’ वाचल्याबरोबर
नमूताई खवळली. प्रधानसेवकांना असं काही म्हटलेलं तिला मुळीच चालायचं नाही.
त्यामुळं त्या पदाची आणि देशातील ६०० कोटी जनतेची अप्रतिष्ठा होते, असं तिला वाटायचं. तसं तिनं
लगेच पोस्टूनही टाकलं. एरवी गप्प असणाऱ्या चतऱ्यानं (म्हणजे चित्तरंजन!) तिला लगेच सुनावलं, ‘नमूताई, आपली लोकसंख्या सव्वा अब्जांच्या आसपासच आहे गं अजून. तू आणि
ढेप्यानं लग्न केल्यावर ती फार तर एका-दोनानं वाढेल.’ 👪 त्या
दिवशी सर्वाधिक अंगठे चतऱ्यानं मिळवले. बऱ्याच मेंबरांनी हसून हसून पुरेवाट
झाल्याची भावना व्यक्त केली - 😛 😜 😝 😁
ढेप्या आणि नमूताई यांचं
ग्रूपवर वाजणं आता काही नवं राहिलं नव्हतं. ढेप्या म्हणजे नमूताईच्या भाषेत ‘फुरोगामी’. आणि ढेप्या
तिचा उल्लेख ‘भगतबाई’ असा करू लागला.
या दोघांचं पुढं कसं काय व्हायचं, अशी काळजी एव्हाना ग्रूपवरच्या बऱ्याच मेंबरांना
वाटू लागली होती. एरवी ते जोडीनं फिरायला जात असले, सिनेमाला जात असले आणि घरी
येणं-जाणं असलं, तरी ग्रूपवर मात्र त्यांचं जमताना दिसत नव्हतं. ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण...’ असंच तिथलं चित्र.
सामाजिक, राजकीय, साहित्यिक, आपल्या परंपरा, आयुर्वेद, डॉक्टरी सल्ले... सगळ्याच
बाबतीत या ॲडमिनजोडीची टोकाची मतं व्यक्त होत होती. राजकीय पोस्ट वर्ज्य
असा नियम असलेल्या या ग्रूपवर ‘फेकू’, ‘पप्पू’ अशा शब्दांची
फेकाफेक सुरू झाली.
बनहट्टीनं (जयेश बनकर
त्याचं नाव. पण बाबा भयंकर हट्टी. म्हणून शोनूबाळानं त्याला बनहट्टी बनवलेलं
सगळ्यांनाच पसंत पडलं.) मध्येच कधी तरी एक ‘सेमी-नॉनव्हेज’ जोक टाकला.
तो वाचून ताई संतापली. 😡 😠 😠 😠 असा
संताप व्यक्त करत तिनं बन्याला खूप काही सुनावलं. नैतिकता, सभ्यता, महिलांची
प्रतिष्ठा इत्यादी इत्यादी.
ढेप्यानं आधी विनोद वाचलाच नव्हता. पण ताई संतापल्याचं
पाहून त्यानं तो वाचला आणि त्याच्यावर इमोजीचा पाऊसच पाडला - 😂 😆 😇 😊 😍 नंतर तो ताईकडं वळला - ‘बास झाली गं तुझी ताईबाजी. भैताड लेक्चर
देऊन राहिली (ही वाक्यरचना खास तिला ‘राधिका’ आवडते म्हणून). विनोदाकडं विनोद म्हणून बघ ना कधी तरी. मुलींच्या ग्रूपवर
तर ह्याच्याहून भयंकर विनोद असतात.’ नमूताई अजूनच भडकली. पेट्रोलच्या
किमती भडकाव्यात तशी. ‘तू ड्यू-आयडी घेऊन किती मुलींच्या
ग्रूपमध्ये आहेस ते सांग ढेप्या!’ ढेप्या-नमूताई ठिणगी
पडल्यामुळं त्या दिवशी ग्रूप शांतच राहिला.
मध्येच एकदा ‘धर्मग्रंथी’नं, अर्थात गीता पाटीलनं धमाल उडवून दिली. तिनं मेसेज टाकला - ‘प्रो. डॉ. शर्मा अखेर गेले...’ डॉ. शर्मा तसे विद्यार्थिअप्रिय शिक्षक. पण गीताचा मेसेज वाचून ‘RIP’, ‘RIP’ सुरू झालं. ही इंग्रजाळलेली रीत मान्य नसल्यानं नमूताईनं ‘ओम शांती...’ म्हणून श्रद्धांजली वाहिली. मेसेजमध्ये ‘अखेर’ शब्द वापरल्यानं तिनं धर्मग्रंथीला थोडं झापलंही.
मध्येच एकदा ‘धर्मग्रंथी’नं, अर्थात गीता पाटीलनं धमाल उडवून दिली. तिनं मेसेज टाकला - ‘प्रो. डॉ. शर्मा अखेर गेले...’ डॉ. शर्मा तसे विद्यार्थिअप्रिय शिक्षक. पण गीताचा मेसेज वाचून ‘RIP’, ‘RIP’ सुरू झालं. ही इंग्रजाळलेली रीत मान्य नसल्यानं नमूताईनं ‘ओम शांती...’ म्हणून श्रद्धांजली वाहिली. मेसेजमध्ये ‘अखेर’ शब्द वापरल्यानं तिनं धर्मग्रंथीला थोडं झापलंही.
उत्तरादाखल धर्मग्रंथीनं
लिहिलं - ‘तुमचा सगळ्यांचाच गैरसमज झालाय.
शर्मा दीड वर्षापासून जर्मनीला मुलाकडं जाणार असं सांगत होते. ते गेल्या आठवड्यात तिकडं
रवाना झाले म्हणून मी तसं टाकलं.’ तिनं शेवटी लिहिलं -
सगळ्या ‘RIP’वाल्यांसाठी ‘RIP’! Cool down guys!!
ठिणगी पडली होती.
वातावरण धुमसतच होतं. नमूताईनं त्या दिवशी एका स्वयंघोषित आयुर्वेदाचार्याची पोस्ट
फॉरवर्ड केली - रोज उठल्यावर पिता येईल तेवढं गरम पाणी प्या आणि अंघोळ नेहमी गार
पाण्यानं करा. खाली कंसात विशेष सूचना होती - आले तसे वाचून पुढे पाठवले.
‘ही आणखी एक फेकू पोस्ट’ अशी सुरुवात करून ढेप्यान जोरदार बॅटिंग केली. अंघोळीला पाणी गरम हवं आणि
सोसवेल एवढं गार पाणी प्यावं. सकाळी उठून दोन लिटर पाणी पिऊन किडन्या बुडवून
टाकायच्यात काय? 😔 😕 आणि आलं तसंच पुढं ढकलायचं म्हटल्यावर
शाळा-कॉलेजात एवढी वर्षं घालवायची तरी कशाला...’
मध्येच कधी तरी जीडीपीचा
विषय निघाला. ‘नोटाबंदीमुळं ही परिस्थिती आली.
गेल्या ७० वर्षांत
असं कधी झालं नव्हतं,’ असं ढेप्यानं लिहिलं. त्याचा
अनुल्लेख करीत नमूताईनं पोस्टलं, ‘हो, आलू की फॅक्ट्री उघडली
असती, तर असं नक्कीच झालं नसतं हं.’ 😨 😂 😉
पुढचे काही दिवस ‘फेकू’ आणि ‘पप्पू’ यांच्या निमित्तानं ढेप्या आणि नमूताई
एकमेकांना ट्रोल करीत राहिले. अक्षयकुमारच्या ‘रुस्तम’ला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळालं आणि भडका उडाला. ‘खरं
तर सुवर्णकमळावर ‘दंगल’चा अधिकार आहे.
पण आमिर कुठंय प्रधानसेवकांचा मित्र!’, असं ढेप्यानं लिहिलं.
आक्कीची जबरा फॅन असलेल्या नमूताईला हे सहन झालं नाही. ती ग्रूप इन्फोवर गेली.
स्क्रोल करत ‘एक्झिट द ग्रूप’पर्यंत
पोहोचली आणि खटकन बटन दाबलं!
-------xxx------xxx-------
ग्रूपवर दोन-चार दिवस शांतताच होती. ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई...’ असं शोनूबाळानं
विचारलंही. नमूताईनं ग्रूप सोडल्याचं त्याला माहीतच नव्हतं. कळल्यावर त्यानं
ढेप्याला बोल लावला. त्यामुळं ढेप्या भयंकर चिडला. ॲडमिनची जबाबदारी शोनूबाळाच्या
खांद्यावर टाकून त्यानं नमूताईचं अनुकरण केलं.
एनडीएमध्ये फूट पडली! दोन्ही नाराज शिलेदार बाहेर. त्यांनी अजून
वेगळा ग्रूप सुरू केला नव्हता, एवढाच काय तो दिलासा. आघाडीची बिघाडी झाल्यामुळं
सगळे ‘...अँड असोसिएट्स’ अस्वस्थ.
चतऱ्यानं तेवढ्यात शहाणपणा केला. त्यानं साळसूदपणे विचारलं, ग्रूपच्या नावापुढची इमोजी बदलू का? आता ही टाकू? - 💔 💔 चतऱ्याचा आगावूपणा कुणालाच आवडला नाही. सगळ्यांनी त्याच्यावर पडी केली त्या दिवशी.
चतऱ्यानं तेवढ्यात शहाणपणा केला. त्यानं साळसूदपणे विचारलं, ग्रूपच्या नावापुढची इमोजी बदलू का? आता ही टाकू? - 💔 💔 चतऱ्याचा आगावूपणा कुणालाच आवडला नाही. सगळ्यांनी त्याच्यावर पडी केली त्या दिवशी.
ढेप्या आणि नमूताई, दोघांचीही
समजूत काढून पुन्हा ग्रूपमध्ये आणण्यासाठी ‘मेंबरा लोग’चं शोनूबाळवर दडपण सुरू झालं. दोघांशीही
फोनवर बोलून शोनूबाळानं त्यांना राजी केलं. ढेप्यानं फार आढेवेढे नाही घेतले.
नमूताईनं मात्र ॲडमिननं ग्रूपचे नियम बनवले पाहिजेत, या अटीवर पुन्हा प्रवेश
केला.
मूळचे ॲडमिनद्वय आता साधे मेंबर
झाले होते. एकमेकांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देण्याचं दोघंही कटाक्षाने टाळत. कधी
विषय निघालाच, तर आपण त्याची पोस्ट वाचतच नाही, असा आविर्भाव असायचा त्यांचा. ‘मला पीएच. डी.चा थिसिस दोन महिन्यांत
द्यायचाय. त्यामुळं चिल्लर पोस्ट वाचून त्यावर कमेंटून वाया घालवायला माझ्याकडं
वेळच नाही,’ असं लिहून नमूताईनं खिजवलं. ढेप्याही साहित्य,
समाजकारण, तत्त्वज्ञान वगैरे पोस्ट फॉरवर्ड करू लागला. मधूनच तो छान छान गाणीही
टाकी. त्याला लाईक करायचा मोह होऊनही नमूताई तो टाळत राहिली.
ॲडमिनच्या अधिकारात शोनूबाळानं
नवीन काही मेंबर केले. पियू त्यापैकीच एक. एकदम ॲक्टिव्ह मेंबर. रोज वेगवेगळ्या
पोस्ट. सहसा कधीच न वाचलेल्या. विनोदही हटके. कुणाच्याही पोस्टवर पियूच्या
हजरजबाबी कमेंट हमखास.
ग्रूपवरचा पियूचा वाढता
वावर नमूताईला जाणवू लागला. त्याहून तिला खटकू लागलं ते पियूच्या पोस्टवरचं ढेप्याचं वाढतं वावरणं.
प्रत्येक पोस्टवर त्याची काही तरी प्रतिक्रिया असेच. कधी कधी तर तो फार फार
आवडल्याचे लाल बदामही टाके. हे बदाम पाहिले की, नमूताईचा नुसता जळफळाट होई. पियू
कोण हे कुणाला विचारलं, तर आपल्याला ‘जळूबाई’ म्हणतील सगळे, असं वाटल्यामुळं गप्पच राहिली
ती.
ढेप्या आणि नमूताईचा ‘स्मार्ट’ संवाद बंद
असल्यानं ग्रूपवर तशी शांतताच असायची हल्ली. कोणी कुणाला डिवचत नव्हतं की, कुणी
चिडवत नव्हतं. हिरीरीनं भांडणंही होत नव्हती. धर्मग्रंथीच्या एका पोस्टवर नमूताईनं
शंका विचारली. धर्मग्रंथीनं तिला ‘Oh! You Nurd’ असं हिणवलं.
नमूताईला कुणी काही सुनावल्याचं वाईट वाटलं म्हणून नाही, पण Nurd शब्दामुळं ढेप्या चिडला. धर्मग्रंथीला सुनावताना त्यानं लिहिलं, ‘तुला उत्तर माहीत नसलं, तर तसं कबूल कर. Nurd म्हणून
हिणवत तूच ते असल्याचं सिद्ध केलंस.’ त्यावर ‘तुला का रे बाबा एवढा पुळका?’ असं तिनं शहाजोगपणे
विचारलं. पण कुणीच तिकडे लक्ष नाही दिलं. ढेप्यानं आपली बाजू घेतल्याचं पाहून इकडे
नमूताईला बरंच बरं वाटलं.
व्हॉट्सॲपीय संवाद बंद
असला, तरी त्याची कल्पना नमूताई आणि ढेप्या, दोघांच्याही घरी नव्हती. ढेप्या
प्रमोशनसाठी परीक्षा देत होता आणि नमूताईची पीएच. डी.ची तयारी अंतिम टप्प्यात.
त्यामुळंच दोघं आपापल्या व्यापात दंग आहेत, असं घरच्यांना वाटत होतं.
त्या दिवशी नमूताई खूश
होती. तिचा पीएच. डी.चा प्रबंध मान्य झाला होता. आता फक्त पदवी मिळणंच बाकी.
तिच्या ‘हिटलर’नं
मोठ्या आनंदानं ढेप्याच्या आईला ही बातमी कळवली आणि म्हणाली, ‘आता मार्ग मोकळा झाला हो बाई. घ्या एकदा बोलवून तुमच्या घरी कायमचं.’ हा फोन चालू असतानाच नेमकं ढेप्यानं थोडं ऐकलं आणि काय झालं असावं, याचा
त्याला अंदाज आला.
ढेप्याच्या ‘हिटलर’नं फोन केला
तेव्हा नमूताई बाबांबरोबर बाल्कनीतच चहा पित उभी होती. ‘तुमचा
जावई परीक्षा पास झाला. आता मोठं प्रमोशन मिळणार,’ असं
त्यांनी सांगितल्याचं नमूताईच्या कानावर पडलंच.
‘NDA’वर दुसऱ्या दिवशी सकाळी पहिलीच पोस्ट होती
ढेप्याची - ‘आपल्या सर्वांच्या लाडक्या नमूताई आता नावामागं ‘डॉ.’ लावण्यास पात्र झाल्या. मित्रों, आपण अभिनंदन
करू त्यांचं...’ ✊ 👌 👌 👌
या पोस्टमधलं ‘मित्रों’ नमूताईला
खटकलं नाही. आपणच आपल्या पीएच. डी.ची पोस्ट टाकून जाहिरात कशी करायची, हा तिचा
प्रश्न आपोआप सुटला. ढेप्याला आपल्याबद्दल अजूनही काही वाटतं, हे कळून ती मनातल्या
मनात खुलली.
पुढच्याच क्षणी तिनं
पोस्टायला सुरवात केली - ‘ढेप्याकडून खरे खरे पेढे
मागवा रे. पप्पू असूनही बँकेचा रिजनल मॅनेजर झालाय तो!’ 👏 👏 👏
एकामागोमागच्या या दोन
पोस्टनं वातावरणच बदललं. ग्रूपवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. ते गुलाब 🌹🌹, ते
गुच्छ , ते अंगठे 👍 👌 पाहत असतानाच नमूताईचा फोन वाजला. ढेप्याच होता तो.
थोडा वेळ बोलणं झाल्यावर
नमूताईला पियूची आठवण झालीच. तिनं थोडं घुश्शातच विचारलं, ‘‘काय म्हणतेय रे ढेप्या तुझी ती पियू? तुझं अभिनंदन करायला आली नाही वाटतं आज.’’
हे ऐकून ढेप्या हसतच
सुटला. ते आवरताना त्याचा आय-फोनही हातातून पडला. हसू आवरून तो म्हणाला, ‘‘नमूताई, अगं ‘ती’ पियू नाही गं; ‘तो’ पियू. पीयूष जाधव आहे तो! शोनूबाळाच्या मित्राचा
मित्र, प्राध्यापक पीयूष.’’
त्यानंतर दोनच दिवसांनी
चतऱ्यानं ग्रूपवर स्फोट घडवला... ‘आजची रीअल ब्रेकिंग न्यूज’ म्हणत त्यानं लिहिलं ‘ढेप्या-नमूताईचं शुभमंगल दिवाळीनंतरच्या पहिल्या रविवारी. दोन्हीकडच्या
हिटलरांचा ग्रीन सिग्नल. बिघाडी संपून आघाडी अधिक दमदार. वाजव रे डीजे...तुला
आघाडीची शप्पत!’ 💒 ✅ ✅ 💃 🎷 🎷 🎷
----------
(नगर जिल्हा
वाचनालयानं आयोजित केलेल्या पद्माकर डावरे राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेत
तिसरं बक्षीस मिळालेली ही कथा. देवाशप्पथ खरं सांगतो, स्पर्धेत फक्त तिघांनीच भाग
घेतला नव्हता हो! एकूण ७४ कथा
त्यासाठी आल्या होत्या.)