![]() |
विजयाचा जल्लोष, देशबांधवांना दिलासा! |
देशबांधवांना खात्रीनं अन्नधान्याचा पुरवठा करता येईल, दैनंदिन गरजा पूर्ण होतील, आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करता येईल...अशा विविध तातडीच्या कारणांसाठी श्रीलंकेला आशियाई विकास बँकेकडून ७३ अब्ज रुपयांचं कर्ज मदतीच्या स्वरूपात हवं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळातील ३७ राज्यमंत्री सचिवांविनाच काम करीत आहेत. जनतेच्या पैशाचा विनियोग अत्यावश्यक नि योग्य कामांसाठी व्हावा, ह्यासाठी त्यांनी आपल्या भत्त्यांवर पाणी सोडण्याची तयारी दाखविली आहे. सार्वजनिक क्षेत्रांतील कर्मचारी भरती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
पाकिस्तानचा जवळपास एक तृतीयांश भाग पुराच्या तडाख्याने हतबल झालेला दिसतो. चौदाशे नागरिकांचा मृत्यू, चल-अचल संपत्तीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ह्या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी पाकिस्तानला अब्जावधी रुपयांच्या मदतीची गरज भासेल. आमच्यापर्यंत मदत पोहोचलीच नाही, असा आक्रोश असंख्य पूरग्रस्त करताना पाहायला मिळतात.
.
,
,
‘If you play good cricket, a lot of bad things get hidden.’
...भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिलदेव ह्याचे हे उद्गार आहेत म्हणे. श्रीलंकेतील सव्वादोन कोटी आणि पाकिस्तानातील २३ कोटी लोकसंख्येला बऱ्याच वाईट गोष्टींचा विसर पडला तर हवाच आहे. त्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष रविवारी (११ सप्टेंबर) दुबईतील क्रिकेट स्टेडियमकडे लागलं होतं. अनेक दिवसांचं दुःख, तणाव ह्यातून थोडी सुटका मिळावी म्हणून आपल्या संघानं आशिया करंडक जिंकावा, अशी आस त्यांना होती. हीच भावना श्रीलंकेतील आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र ‘द संडे टाइम्स’ने रविवारी व्यक्त केली. दैनिकाचा क्रीडा समीक्षक लिहितो, ‘ही लढत जो संघ जिंकील, तो आपल्या देशबांधवांच्या चेहऱ्यावर हसू फुलवील. हे विजेतेपद आर्थिक, नैसर्गिक संकटांमुळे हताश झालेल्या, मोडून पडलेल्या देशवासींना दिलासा देईल.’
श्रीलंकेचे यश
देशबांधवांना असा दिलासा देण्यात दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरला! लागोपाठ दुसऱ्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला धूळ चारली. ‘सुपर फोर’च्या शेवटच्या सामन्यात पाच गडी राखून आणि स्पर्धेच्या अंतिम लढतीत २३ धावांनी. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानची गती विजेत्यांच्या तुलनेत षट्कामागे एका धावेहून किंचित जास्तच संथच राहिली.
![]() |
यश एका पायरीने जवळ...श्रीलंकेच्या खेळाडूंचा आनंदोत्सव. |
अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील बारापैकी नऊ सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणारा संघ यशस्वी ठरला. खुद्द श्रीलंकेनेही अंतिम फेरी गाठताना सलग चार सामने जिंकले ते लक्ष्याचा पाठलाग करूनच. आज नाणेफेकीचा कौल विरुद्ध जाऊन आणि त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करावी लागूनही शनाकाच्या संघाने कच खाल्ली नाही. कोणतंही मोठं नाव नसलेल्या ह्या संघाने ही मोठी स्पर्धा जिंकली. एकही स्टार नसलेला संघ सुपरस्टार ठरला.
फिनिक्स-भरारी
आशिया करंडक स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून आठ गडी राखून पराभूत झालेला श्रीलंकेचा संघ अशी फिनिक्स-भरारी घेईल, अशी अटकळ क्रिकेटपंडितांनी कितपत बांधली असले, ह्याची शंकाच आहे. त्यांची गटातील दुसरी लढत बांग्ला देशाशी होती. सामन्यापूर्वीच जोरदार शब्दयुद्ध झाले. बांग्ला देश संघाचे प्रशिक्षक खालेद महमूद आणि जखमी झाल्यामुळे स्पर्धेत न खेळणारा यष्टिरक्षक नुरूल हसन ह्यांनी श्रीलंकेला डिवचले. ‘दखल घ्यावी, असा एकही गोलंदाज श्रीलंकेच्या संघात नाही,’ असं महमूद म्हणाले होते. ह्याला श्रीलंकेनं मैदानात चोख उत्तर दिलं. बांग्ला देशाला दोन गडी राखून हरवून संघानं विजयी वाटचाल चालू केली.
‘सुपर फोर’मधील तिन्ही लढती जिंकताना श्रीलंकेचा खेळ सामन्यागणिक उंचावत गेला. स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणविल्या जाणाऱ्या भारतावर सहा गडी राखून विजय मिळवताना त्यांना लय गवसली. त्या सामन्यात कर्णधार शनाका व भानुका राजपक्षे ह्यांनी कसोटीच्या वेळी ३५ चेंडूंमध्ये ६४ धावा कुटत अवघड वाटणारा विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील शेवटचे दोन सामने त्याच प्रतिस्पर्ध्यांमध्ये झाले - श्रीलंका व पाकिस्तान. ‘सुपर फोर’ आणि अंतिम लढत, दोन्ही वेळा पाकिस्तानचे दहाही गडी बाद करण्याची किमया श्रीलंकेच्या ‘अदखलपात्र’ गोलंदाजांनी केली! वानिंदू हसरंगा डी’सिल्वाचे लेगस्पिन आणि गुगली ओळखण्यात पाकिस्तानचे फलंदाज साफ अपयशी ठरले. त्याने दोन सामन्यांत मिळून सहा बळी मिळवले. तशीच कामगिरी प्रमोद मदुशान ह्यानं केली. त्याचं पदार्पणच मुळी शेवटून दुसऱ्या सामन्यात झालं.
मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला
![]() |
निकडीच्या वेळी निर्णायक खेळी. |
पाकिस्तानी फलंदाजीची ताकद बघता आणि अफगाणिस्तावर त्यांच्या तळाच्या फलंदाजांनी मिळविलेला सनसनाटी विजय ताजाच असल्यामुळे १७१ धावांचे लक्ष्य अशक्यप्राय वाटणारे नव्हते. इथे श्रीलंकेच्या मदतीला धावला दुसराच आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा प्रमोद मदुशान लियानगामगे. आपल्या पहिल्या आणि डावातील तिसऱ्या षट्कांत त्याने आधी कर्णधार बाबर आझमला व त्या पाठोपाठच्या चेंडूवर फखर झमानला बाद केले.
यष्टिरक्षक महंमद रिझवान व इफ्तिकार अहमद ह्या जोडीने जम बसवला होता. त्यांची ७१ धावांची भागीदारी धोकादायक ठरणार असं वाटत असतानाच श्रीलंकेच्या मदतीला पुन्हा धावला तो प्रमोद मदुशान. इफ्तिकारचा फसलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून डीप स्क्वेअर लेगच्या सीमेपर्यंत धावत जाऊन अशेन बंदारा ह्यानं चांगला पकडला. तरीही रिझवानला लय सापडलेली असल्यामुळे पाकिस्तानला अगदी अडचणीत आहे, असं म्हणता येत नव्हतं. पण सोळाव्या षट्कात महंमद नवाज बाद झाला आणि श्रीलंकेला विजयाचा वास लागला.
सतरावं षट्क धोक्याचं...
![]() |
हसरंगाच्या गुगलीची कमाल. |
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच बाबींत श्रीलंकेचा संघ पाकिस्तानला वरचढच ठरला. विशेषतः त्यांचं क्षेत्ररक्षण फार सरस झालं. अंतिम सामन्याचा मानकरी हसरंगा की राजपक्षे, हा मोठा जटील प्रश्न होता. पण हसरंगा स्पर्धेचा मानकरी निवडला गेला आणि राजपक्षेच्या जबाबदारीने केलेल्या खेळीवर सामन्याचा मानकरी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. श्रीलंकेचं आठ वर्षांतलं हे पहिलंच महत्त्वाचं यश. देश अनंत अडचणींना तोंड देत असताना सामान्य माणसाला त्याचा काही काळापुरता विसर पडायला लावणारं झळझळीत यश!
ऑस्ट्रेलियात पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. आशिया करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या सहापैकी चार संघांचा त्यातील प्रवेश निश्चित आहे. उरलेले दोन संघ म्हणजे विजेता श्रीलंका आणि तळाला राहिलेला हाँगकाँग. वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे ह्यांच्यासह श्रीलंकेलाही पात्रता फेरीत खेळून स्वतःला सिद्ध करणं भाग आहे. आशियाई विजेतेपद त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास नक्कीच मदत करील.
.........
(छायाचित्रे सौजन्य : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, ‘डेली न्यूज’, ‘डॉन’ ह्यांच्या संकेतस्थळावरून. माहितीस्रोत : विविध संकेतस्थळे.)
.........
#cricket #T20 #asia_cup22 #SriLanka #Pakistan #Wanindu_Hasaranga #Bhanuka_Rajapaksa #reliefforLanka
.........
सतीश स. कुलकर्णी
संपर्क - sats.coool@gmail.com
.........